औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त अडीच तासांचा! असा असेल नवा रस्ता | पुढारी

औरंगाबाद-पुणे प्रवास फक्त अडीच तासांचा! असा असेल नवा रस्ता

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद -पुणे नवा द्रुतगती महामार्ग 268 कि.मी. लांबीचा असेल आणि या दोन शहरांतील प्रवास अवघ्या अडीच तासांत पूर्ण करता येईल. पुणे- बंगळुरू या नव्या महामार्गाला, तसेच नगर जिल्ह्यात सुरत- चेन्नई महामार्गास हा रस्ता जोडला जाणार असल्याने औरंगाबाद शहर बंगळुरु, चेन्नई, सुरत, दिल्लीशी जोडले जाईल, अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 13) येथे केली.

गुरुपौर्णिमेनिमित्त मिटमिटा येथील मच्छिंद्रनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर गडकरी यांनी मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद – पुणे या नव्या 268 कि.मी. द्रुतगती महामार्गाचे अलाइन्मेंट निश्चित करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, “सध्याच्या रस्त्यापेक्षा नव्या रस्त्याची लांबी 20 कि.मी. जास्त असणार आहे. पुण्याच्या रिंगरोडजवळील शिरसे या टोलनाक्यावरून हा महामार्ग पुणे- बंगळुरु नव्या रस्त्याशी जोडला जाईल. त्यामुळे औरंगाबादकरांना पुणे येथे अडीच तासांत, तर पुढे बंगळुरु येथे साडेतीन तासांत पोहचता येईल. हा महामार्ग नगर जिल्ह्यात सुरत – चेन्नई महामार्गाशी जोडला जाईल. औरंगाबादच्या पुढे शेंद्रा येथे समृद्धी महामार्गाशी हा रस्ता जोडण्यात येणार असल्याने भविष्यात औरंगाबाद शहर हे बंगळुरु, चेन्नई, नागपूर, दिल्ली, सुरत, अहमदाबादशी थेट जोडले जाईल.”

12 हजार कोटींचा खर्च : 12 हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद- पुणे द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार आहे. नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातून हा रस्ता जाणार असल्याने त्या भागाच्या विकासास चालना मिळेल. महामार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, येत्या तीन ते चार महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पुणे शहरात जाण्याची गरज नसल्याने प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

शिवसेनेचे मानले आभार : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा वसेनेचा निर्णय स्वागतार्ह असून, याबद्दल मी शिवसेनेला धन्यवाद देतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

असा असेल नवा रस्ता

औरंगाबाद ते पैठण (55 कि.मी), आष्टी (साडेसहा कि.मी) श्रीगोंदा, पारनेर, नगर, पाथर्डी (126 कि.मी), भोर, दौंड, पुरंदर, हवेली, शिरूर (80 कि.मी) अशी औरंगाबाद -पुणे महामार्गाची अलाइन्मेंट असणार आहे. बिडकीन डीएमआयसी (8 कि.मी) आणि रांजणगाव एमआयडीसीला (20 कि.मी) हा रस्ता जोडला जाईल.

Back to top button