औरंगाबाद : गटबाजीचा संसर्ग शिवसेनेत सुरूच

औरंगाबाद : गटबाजीचा संसर्ग शिवसेनेत सुरूच

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : आमदारांच्या बंडानंतरही शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील गटबाजीचा संसर्ग कायम असल्याचे चित्र आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन ही भेट घडवून आणली. मात्र, या बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व महत्त्वाच्या व्यक्ती हजर नव्हत्या. यांतील काही जणांनी आपल्याला बैठकीचा निरोपच नसल्याचे स्पष्ट केले, तर काहींनी त्यांच्या नावावर स्थानिक नेत्यांनी काट मारल्याचा आरोप केला.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाभरातील निवडक पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ 'मातोश्री'वर पोचले. या भेटीची वेळ दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाली होती. त्यानुसार हे शिष्टमंडळ दुपारी 'मातोश्री'वर गेले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. मात्र, या बैठकीला माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर विकास जैन, सहसंपर्कप्रमुख र्त्यंबक तुपे, युवा सेनेचे सहसचिव आणि माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी महापौर गजानन बारवाल, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, युवा सेनेचे विद्यापीठ अध्यक्ष विजय सुबुकडे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी हजर नव्हते. यांतील काही जणांकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हांला बैठकीचा निरोपच नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी अजूनही सुरूच असल्याचे समोर आले आहे.

बैठकीला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बंडू ओक, संतोष जेजूरकर, अशोक शिंदे, कृष्णा डोणगावकर, मनोज गांगवे, ज्ञानेश्वर डांगे, यांच्यासह शहर आणि जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. सुरुवातीला या पदाधिकाऱ्यांनी काहीही झाले तरी आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, अशी ग्वाही हात उंचावून दिली. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना आपण काय कमी केले असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील आमदारांबद्दल नाराजी व्यक्त केली. पण सोबतच पक्ष संघटना मजबूत आहे, तुम्ही जोशाने तयारी करा, येणाऱ्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, त्यादृष्टीने आतापासूनच कामाला लागा, काळजी करू नका, न्यायालयीन लढाही सुरूच राहील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news