बीड : भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडक; शीर धडावेगळे | पुढारी

बीड : भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडक; शीर धडावेगळे

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : गेवराईत भिक्षा मागून पाचोडकडे निघालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) गावानजीक शनिवारी रात्री घडली. रियाज उस्मान सय्यद (वय ४५,  रा. पाचोड, कल्याणानगर, ता. पैठण) असे अपघातात ठार झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोड येथील रियाज सय्यद हा नेहमीप्रमाणे शनिवारी गेवराई येथे भीक्षा मागण्यासाठी आला होता. दिवसभर त्यांनी हिंडून, फिरुन दुकानदारांकडून पैसे गोळा केल्यानंतर संध्याकाळी गेवराई येथून पाचोडकडे पायी निघाला होता. दरम्यान, गेवराईजवळील खामगावजवळ येताच पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्याला तब्बल १० ते १२ किमीपर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात रियाज सय्यद याच्या शीर धडावेगळे झाले.

शहागड येथील काही जणांना बीडकडून येत असताना रियाजचा मृत्तदेह दिसला. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. रविवारी नातेवाईकांकडे उत्तरणीय तपासणी करून मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे. रियाज सय्यद यांच्यापश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, असा परिवार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button