

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा चार दिवसांआडवरून पाच दिवसांआड करण्यात आला होता. हा पुरवठा पुन्हा चार दिवसांआड करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, तरीदेखील शहरवासीयांना आणखी एक महिनाभर चार दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शहराचा पाणीप्रश् न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी 42 कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात हर्सूल तलाव, जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा वाढविण्यासह इतर उपाय-योजनांचा समावेश आहे. यातील काही कामे पूर्ण झाल्याने सुमारे 10 ते 12 एमएलडी पाण्याची वाढ झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पाच दिवसांऐवजी चार दिवसांआड कधी होणार, याविषयी उत्सुकता आहे, परंतु हे आणखी महिनाभर तरी शक्य नसल्याचे मनपा प्रशासक पांडेय यांनी मंगळवारी सांगितले. पांडेय म्हणाले, की शहरात दररोज येणार्या पाण्यामध्ये किमान 20 एमएलडी पाणीवाढ करण्यासाठी 42 कलमी कार्यक्रम आहे. हर्सूल तलावातून सात एमएलडीपर्यंत पाणीउपसा वाढला आहे.
जायकवाडीतून 12 एमएलडीपर्यंत पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत पाच एमएलडी पाण्याची वाढ झाली आहे. महिनाभरात पंप, व्हॉल्व्ह बदलणे, अशी कामे पूर्ण होतील. त्यानुसार 30 जुलैला आढावा घेतला जाईल. त्यानंतर पाणीपुरवठा पाच दिवसांऐवजी चार दिवसांआड करण्याचा निर्णय घेतला जाईल. पहिला प्रयोग सिडकोत हर्सूल तलावातून आधी 5 एमएलडी पाणी उचलले जात होते. आता ते 12 एमएलडी होणार आहे. ते झाल्यावर सिडकोतून हर्सूलकडे जाणारे जायकवाडीचे पाणी वाचेल. त्यामुळे सुरुवातीला सिडको-हडकोत चार दिवसांआड पाणी देण्याचा प्रयोग केला जाईल, असे पांडेय यांनी सांगितले.