हिंगोली: जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकरी अडचणीत

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः मागील आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकर्यांनी अत्यल्प पावसावर पेरणीचा जुगार खेळला. परंतु, आता पावसाने उघडीप दिल्याने बियाणांची उगवण होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ
येण्याचे संकट घोंगावत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडेल, असा
अंदाज वर्तविला होता. परंतु, मृग नक्षत्रात पाऊस झालाच नाही.
आर्द्रा नक्षत्रात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.या पावसावरच अनेक शेतकर्यांनी पेरणीची घाई केली. कृषी विभागाने शंभर मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन केले. तरी शेतकर्यांनी मात्र पेरणी केली. मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस गायब झाला असून दिवसा कडाक्याचे ऊन राहतअसून वार्याचा वेगही वाढल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतआहे. अत्यल्प पावसाच्या भरवशावर शेतकर्यांनी पेरणी केली.
काही ठिकाणी बियाण्यांची उगवण होत आहे. परंतु बहुतांश ठिकाणी पावसाने खंड दिल्यामुळे बियाणांच्या उगवण शक्तीवर परिणाम झाला असून शेतकर्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागणार आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास बहुतांश शेतकर्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत यंदाची पेरणी शेतकर्यांसाठी अडचणीची ठरली असून पाऊस समाधानकारक पडत नसल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जिल्ह्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाल्याचा अंदाज आहे.अजूनही शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ज्या शेतकर्यांनी पेरणी केली आहे, त्यांना दुबार पेरणीच्या संकटाची भीती वाटत आहे. ज्या शेतकर्यांची पेरणी राहिली आहे, त्यांना पेरणी उशिरा होण्याची धास्ती लागली आहे. एकीकडे शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे मात्र कृषी विभाग कागदी घोडे नाचविण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक कृषी निविष्टा विक्रेत्यांकडून बोगस खताची विक्री केल्या जात असल्याचा प्रकार घडत आहे. यावर कृषी विभागाकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केला जात आहे.