औरंगाबाद : शाळांच्या मुजोर धोरणाला बसणार चाप; शिक्षण विभागाने नेमली समिती | पुढारी

औरंगाबाद : शाळांच्या मुजोर धोरणाला बसणार चाप; शिक्षण विभागाने नेमली समिती

औरंगाबाद : खासगी शाळांकडून खासगी प्रकाशनाची पुस्तके, वह्या तसेच युनिफॉर्म हे विशिष्ट दुकानात घेण्याबाबत पालकांवर केल्या जाणाऱ्या सक्तीविरोधात ’लुटीची शाळा’ या नावाने वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत दखल घेत, शिक्षण विभागाने शाळांच्या मुजोर धोरणाला रोखण्यासाठी आता समिती स्थापन केली आहे. या समितीकडे शाळेविरोधात पालकाने तक्रार केल्यास शिक्षण विभागाकडून सदर शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून नेमण्यात आलेल्या समितीमुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वह्या, पुस्तके व युनिफॉम ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती, शैक्षणिक शुल्कात भरमसाट वाढ, उपक्रमांच्या नावावर शुल्कवसुली याबाबत खासगी इंग्रजी शाळांना कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही. या शाळा शिक्षण विभागालाही जुमानत नव्हत्या. या खासगी प्रशासनाच्या शाळा मोकाट सुटल्या आहेत. याचा सर्वाधिक मनस्ताप या शाळेत शिक्षण घेणार्‍या पाल्यांच्या सामान्य पालकांना सहन करावा लागत आहे. या विरोधात पालकवर्ग आवाज उठवत नाही, कारण त्यांचे पाल्य त्या शाळेत शिकत असतात. याचाच फायदा शिक्षण संस्था उचलत आहेत. त्यामुळे ज्ञान हे दान नाही, तर ज्ञानाचा बाजार या संस्थाचालकांनी मांडला आहे, मात्र आता अशा शाळांवर कारवाईचा बडगा शिक्षण विभागाने उगारला असून, शिक्षण विभागाकडून जिल्हा स्तरावर तसेच तालुकास्तरावर समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेमुळे आता शाळा पालकांवर करत असलेल्या सक्तीविरोधात पालकवर्गातून आवाज उठवला जाईल

शाळांकडून वह्या, पुस्तके, गणवेश, तसेच वाढते शैक्षणिक शुल्क यांबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हास्तरीय तसेच तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. जिल्हास्तरीय समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी, दोन गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे, तर तालुकास्तरीय समितीवर गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे. सदर समितीकडे पालक शाळेविरोधात लेखी किंवा तोंडी स्वरूपात तक्रार करू शकतात. त्या तक्रारींची दखल घेत शाळांवर कारवाई करण्यात येईल, तर मनपा शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या शाळांविषयक मनपा आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
– जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

Back to top button