परभणी: महाविकास आघाडी सरकारचे अपयश उघड; माजीमंत्री प्रा.राम शिंदे | पुढारी

परभणी: महाविकास आघाडी सरकारचे अपयश उघड; माजीमंत्री प्रा.राम शिंदे

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: धनगर समाजाचे प्रश्‍न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचे सर्व पातळ्यांवरील अपयश आता उघडे पडले आहे. या सरकारचे पाप भरले असल्याची टीका माजीमंत्री तथा विधान परिषद सदस्य प्रा.राम शिंदे यांनी केली.शहरातील बाजार समिती मैदानावर सोमवारी (दि.27) पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संयोजक स्वागताध्यक्ष विठ्ठलराव रबदडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे, माजी आ.रामराव वडकुते, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ.सुभाष कदम, माजी जि.प. सदस्य भगवान सानप, मागासवर्गीय आयोग सदस्य लक्ष्मण हाके, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. अभय कुंडगीर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव प्रणित खजे, भाजपा नेते सुरेश बंडगर, डॉ.आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संचालक मोतीराम कोरके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे हजर होते.

माजीमंत्री आ.प्रा.शिंदे म्हणाले, आगामी राजकीय जीवनात आपण धनगर समाजाचा आवाज होणार असून समाजाचा प्रत्येक प्रश्‍न सरकारपुढे मांडून तो सोडवून घेण्यासाठी आयुष्य खर्ची करणार आहे. धनगर समाज आरक्षणासाठी सरकार कुठलेही असो आपण सरकारशी दोन हात करून आरक्षणाचा प्रश्‍न सोडविल्याशिवाय शांत बसणार नाही अशी घोषणा केली. प्रास्ताविक विठ्ठल रबदडे यांनी केले. सूत्रसंचालन मोतीराम देवकते तर आभार सुरेश बंडगर यांनी मानले. मोतिराम कोरके यांचा समाजाकडून सन्मान डॉ. आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीवर बिनविरोध संचालकपदी निवडून आलेले धनगर समाजाचे युवा नेतृत्व तथा समाजाचे संघटक मोतीराम कोरके यांचा जयंती उत्सव समितीकडून मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करून सन्मान झाला.

Back to top button