नांदेड: गटशिक्षणाधिकारी यांच्यासह 19 पदे रिक्त; तालुक्यात शिक्षणाचा खोळंबा | पुढारी

नांदेड: गटशिक्षणाधिकारी यांच्यासह 19 पदे रिक्त; तालुक्यात शिक्षणाचा खोळंबा

धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीवर अवलंबून आहे. या विभागात गटशिक्षणाधिकार्‍यासह, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह 19 पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी नसल्याने कार्यरत शिक्षकांवर कुणाचाही वचक नसल्याने मनमानी कारभार वाढला आहे. तालुक्यात अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजल्याचे वास्तव चित्र आहे. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षणाचा खोळंबा झाला आहे.

धर्माबाद शिक्षण विभागात रत्नाळी, बाळापूर, जारीकोट, चिकना हे चार केंद्र येतात. यात शहरासह तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 56 शाळा असून, खासगी 29 अशा एकूण 85 शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पट संख्या 5 हजार 870 असून, खासगी शाळेतील विद्यार्थी पट संख्या 11 हजार 159 असे एकूण 17 हजार 29 विद्यार्थी पट संख्या आहे.

येथील शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. लोकदाजी गोडबोले हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहत होते. परंतु त्यांचीही गेल्या महिन्यात बदली झाली असून, प्रभारी पदही दुसर्‍या गावावरून कारभार पाहत आहेत. अद्यापही गटशिक्षणाधिकारी पद रिक्तच आहे. केंद्र प्रमुखांची चार पदे मान्यता असून चारही रिक्त आहेत.

शिक्षकच प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून काम पाहतात. तर शिक्षण विस्तार अधिकारी दोन पदे मान्यता असून एक रिक्त आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची एकूण मान्यता पदे 258 असून 245 शिक्षक कार्यरत आहेत. तर 13 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूणच महत्त्वाच्या गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुखांसह 19 पदे रिक्त आहेत. तालुक्यात शिक्षण विभागात फार मोठ्या प्रमाणात रिक्त पदे होऊन प्रभारी कारभार सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागात कामकाजावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात असल्या तरी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची पदे भरल्याशिवाय यात बदल होणे शक्य नाही. याला शासनाचे धोरणच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

गटसाधन केंद्रातही रिक्त पदांचे ग्रहण

येथील गटसाधन केंद्रात कंत्राटी कर्मचारी असून, येथे वरिष्ठ लेखा सहायक एक, डाटा एन्ट्री ऑपरेटर एक, साधन व्यक्ती सहा विशेष शिक्षण तज्ज्ञ दोन, फिरते विशेष शिक्षक सहा, शालेय पोषण आहार ऑपरेटर एक असे एकूण 17 कंत्राटी कर्मचार्‍यांची मान्यता पदे असून
कार्यरत 13 आहेत. साधन व्यक्ती तीन व फिरते विशेष शिक्षक एक असे चार पदे रिक्त आहेत. एकंदरीत शिक्षण विभागाला संपूर्णतः रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

Back to top button