उमरगा: ईडी, सीआयडीचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक; जेष्ठ विचारवंत श्रीपाल सबनिस | पुढारी

उमरगा: ईडी, सीआयडीचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक; जेष्ठ विचारवंत श्रीपाल सबनिस

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने ईडी, सीआयडीची यंत्रणा पाठीमागे लावून पक्ष सोडायला भाग पाडणे, त्यांना खरेदी करणे असे प्रकार करीत असून, या बाबी लोकशाहीला घातक आहेत. खासदार, आमदाराची खरेदी पन्नास कोटीला होतेय असे दिसते आहे. लोक प्रतिनिधी स्वार्थी बनत आहेत. त्यामुळे संविधानाची शुद्धता व पावित्र्य जपण्याचे काम सुजाण नागरिकांचे आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत श्रीपाल सबनिस यांनी व्यक्त केले.

उमरगा येथे हरिष डावरे यांच्या आक्रोश वेदनेचा या पुस्तक प्रकाशनानिमित्त सबनीस शनिवारी (दि. 25) उमरग्यात आले होते त्या वेळी राज्यातील राजकिय अस्थिरताविषयी विचारले असता,दैनिक पुढारीशी बोलताना सबनीस म्हणाले की, लोकांनी विविध करा मधुन जमा केलेल्या तिजोरीवर राजकिय लोक डल्ला मारुन त्यांच्या दहा पिढ्यांची सोय करून ठेवताहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून पक्ष सोडण्यास भाग पाडले जाते. ही एक बाजू असली तरी गैरमार्गाने जमविलेल्या अमाप संपत्तीचे राजकीय लोकही तितकेत देशाचे मारेकरी आहेत. ही संस्कृती जेव्हा संपेल तेव्हाच देश, राज्य विष मुक्त होईल, असेही श्रीपाल सबनीस म्हणाले लोकशाहीचा खून होतोय आज देशाला पाकिस्तानचे शत्रुत्व राहिलेले नाही. मात्र, देशांतर्गत राजकीय शत्रुत्वाने लोकशाहीचा खून होतोय. एक राजकीय पक्ष दुसर्‍या पक्षाला संपवण्यासाठी द्वेष बुद्धीने सूड उगवत आहेत. त्यामुळे नागरिकांची जबाबदारी खूप वाढली आहे. जनतेनी शुद्ध विचार, आचार आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सबनीस यांनी केले.

Back to top button