औरंगाबाद : शहरात ‘अवैध मद्यविक्रीविरोधी पथक’ स्थापन | पुढारी

औरंगाबाद : शहरात ‘अवैध मद्यविक्रीविरोधी पथक’ स्थापन

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : नशेखोरीमुळे शहरातील गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पोलिस हे रोखण्याचा प्रयत्न करीत असले, तरी अद्याप म्हणावे तसे यश मिळालेले नाही. एनडीपीएस पथकाच्या स्थापनेनंतर कारवाया वाढल्या, पण गुन्हे काही थांबलेले नाहीत. त्यात आता पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ‘अवैध मद्यविक्री विरोधी पथकाची’ स्थापना करून कारवाईची धार आणखी तीव्र केली आहे. या पथकात एक अधिकारी आणि सहा कर्मचारी आहेत.

शहरात बटन गोळ्यांसोबत सिरपची नशादेखील मोठ्या प्रमाणात केली जाते. याशिवाय दारू, गांजा, व्हाइटनर या प्रकारच्या नशेचेही प्रमाण वाढलेले आहे. पोलिसांनी ‘बटन’विरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. मात्र, तरीही गुन्हेगारी काही कमी झलेली नाही. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर थेट ठाण्याच्या आवारातच जीवघेणा चाकूहल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन डॉ. गुप्ता यांनी आणखी आक्रमकपणे कारवाईसाठी मोहीम आखली आहे. नशेखोरांविरुद्ध जोरदार कारवाई करण्यासाठी हे पथक स्थापन करण्यात आले आहे.

पथकाचे कामकाज…

सिडको ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड हे पथकप्रमुख असतील. त्यांच्यासोबत हवालदार मनोज चव्हाण, पोलिस नाईक सुनील जाधव, अंमलदार नितेश सुंदर्डे, अभिजित गायकवाड, परशुराम सोनवणे (चालक) आणि महिला पोलिस अंमलदार आरती कुसाळे यांची पथकात वर्णी लागली आहे. हे पथक देशी, विदेशी मद्याची अवैध विक्री, बनावट मद्यविक्री, हातभट्टी, विनापरवाना मद्य बाळगणे, अशा सर्व प्रकारांवर कारवाई करणार आहे. या पथकाने भरीव सातत्यपूर्ण कारवाई करावी. तसेच, हे पथक गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात काम करणार आहे.

Back to top button