बीड: शेतकरी पुत्र म्हणतो, तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा! | पुढारी

बीड: शेतकरी पुत्र म्हणतो, तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा!

बीड, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात सध्या महाभारत सुरू आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले आहे. याबाबत राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला असल्याचे सांगत शेतकरीपुत्र म्हणून तोडगा निघत नाही, तोपर्यंत मलाच मुख्यमंत्री करा, असे बीड येथील श्रीकांत गदळे या युवकाने म्हटले आहे. याबाबत त्याने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदनही दिले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्रीकांत विष्णू गदळे या युवकाने म्हटले आहे, मी दहा ते बारा वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहे. शेतकरी आणि सामान्य माणसाच्या प्रश्‍नावर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात पाऊस नाही, शेतकरी अडचणीत आणि चिंतेत आहे. या परिस्थितीत अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत करणे अपेक्षित होते, परंतु राज्याच्या राजकारणात सत्ता आणि मुख्यमंत्रिपदावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. या पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्री अथवा सत्ताधारी शेतकर्‍यांना मदत करण्यास असमर्थ आहेत.

घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीत अडचणीतील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी काळजीवाहू अथवा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून माझी निवड करावी, मला संधी द्यावी, असे श्रीकांत गदळे या युवकाने म्हटले आहे. प्रभारी अथवा काळजीवाहु मुख्यमंत्री म्हणून संधी दिल्यास जनतेचे सर्व प्रश्‍न, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांना न्याय देण्याचे काम करीन, असेही श्रीकांत गदळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Back to top button