लातूर: सिलिंडर स्फोटात सहा दुकाने भस्मसात | पुढारी

लातूर: सिलिंडर स्फोटात सहा दुकाने भस्मसात

लातूर, पुढारी वृतसेवा : सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत रस्त्याकडेला थाटलेल्या चादरी, गालीच्यांच्या सहा दुकानांचा कोळसा झाला.आग एवढी मोठी होती की, तिच्यावर नियंत्रण आणण्यासाठी 16 अग्नीशमन दलाच्या जवानांना तब्बल दीड तासांपेक्षा अधिक अवधी लागला. येथील राजीव गांधी चौक परिसरातील रसत्याकडेला चादरी, उशा, गालीचे, लोड आदी साहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत.

शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास तेथील एका दुकानानजीक असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर लिक झाले व त्याचा स्फोट झाला. यात दुकानांना आग लागली . पत्रे तसेच लाकडी पार्टीशन मारलेली या दुकानातील आगीने रोद्र रुप धारण केले. बघता बघता आग फैलावत गेली. उठणार्‍या आगीच्या लोळाने घबराट निर्माण झाली. अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशमनचे चार बंब व 16 जवान यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

परंतु आगीचा जोर उठणारे धुरांचे लोट व अंधार यामुळे त्यांना आगीवर नियंत्रण आणण्यास कसरत करावी लागत होती. तरीही त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याचे अग्निशमन अधिकारी जे. एस. शेख यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती ही दुकाने उत्तर प्रदेशातील कपडा विक्रेत्यांची होती. या आपत्तीत त्यांचे किती रुपयांचे नेमके नुकसान झाले, हे नेमके सांगता येत नसले तरी दहा लाखांपेक्षा अधिकचा हा फटका असू शकतो, अशी चर्चा घटनास्थळी होती.

Back to top button