परभणी : घर फोडून चोरट्यांनी केला साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नवा मोंढा भागातील श्रीराम अपार्टमेंट येथील एका फ्लॅटमधून भरदिवसा दुपारच्या वेळेत दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाख रुपंयाचा ऐवज लांबविला. याप्रकरणी गुरूवारी (दि.23) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीराम अपार्टमेंटमध्ये सत्यनारायण मदनलाल मणियार हे वास्तव्यास असून मंगळवार ते बुधवारी दुपारच्या दरम्याान ते घरी नसताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी आतील कपाटातून 75 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा सेट, तीन तोळे वजनाच्या पाटल्या, दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, पाच तोळे वजनाच्या 10 अंगठ्या यासह झुंबर, ब्रेसलेट व चांदीचे दागिने असा ऐवज लांबविला. या चोरीत चोरट्यांनी घरातील मोबाईलही चोरून नेला. एकूण 5 लाख 45 हजार 500 रूपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. हा प्रकार मणियार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्याशी गुरूवारी संपर्क साधून याबाबतची फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार पोलिस निरीक्षक शरद जर्हाड यांनी भेट देवून पाहणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे हे अधिक तपास करीत आहेत.

