नांदेड : पक्षाचा निरोप येण्यापूर्वीच भाजपचे आमदार मुंबईत! | पुढारी

नांदेड : पक्षाचा निरोप येण्यापूर्वीच भाजपचे आमदार मुंबईत!

नांदेड ; विशेष प्रतिनिधी : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोठ्या राजकीय बंडानंतर राज्यातील संभाव्य सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून निरोप येण्यापूर्वीच भाजपचे जिल्ह्यातील चारही आमदार तसेच पक्षाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर मुंबईमध्ये पोहोचले आहेत. या सर्वांनी पक्षनेत्यांच्या भेटीगाठींचे सत्रही सुरू केले असल्याचे दिसून आले.

गेल्या सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच एकनाथ शिंदे गटाच्या
बंडाची माहिती बाहेर आली. पुढच्या तीन दिवसांत या बंडाची व्याप्ती वाढत गेल्यामुळे सेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. या सरकारमधील तीन पक्ष सत्ता वाचविण्याच्या प्रयत्नात दिसत असताना, हे सरकार आता जाणार असे गृहीत धरून भाजपतही राजकीय हालचालींना सुरूवात होताच, पक्षातले जिल्ह्यातील चार आमदार निरोप येण्याआधीच मुंबईत पोहोचले. विधान परिषद निवडणुकीपासून भाजपचे रिपाइंच्या कोट्यातील आमदार राजेश संभाजी पवार हे मुंबईत तळ ठोकून आहेत. राजकीय घडामोडींदरम्यान त्यांनी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्या निकट राहण्याची दक्षता घेतली. त्यानंतर खा. चिखलीकर, आ. भीमराव केराम, आ. राम पाटील रातोळीकर हेही गुरुवारी दुपारी मुंबईमध्ये पोहोचले. आ. डॉ. तुषार राठोड हेही तेथेच असल्याचे सांगण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बंडाला भाजपची साथसंगत असून या गटाच्या मदतीने राज्याच्या सत्तेवर स्वार होण्याचे भाजपचे प्रयत्न आता लपून राहिलेले नाहीत; पण भाजपच्या नांदेडमधील नेत्यांनी राज्यातील संभाव्य सत्तांतरावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेत गेली अडीच वर्षे आमच्या डोक्यावर बसलेले भूत आता उतरणार आहे, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया खा. चिखलीकर यांनी मुंबईला जाण्याआधी व्यक्त केली. त्यांचा रोख काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर होता.

मुंबईत गेलेले भाजपचे लोकप्रतिनिधी पक्षनेत्यांच्या संपर्कात आहेत. स्थानिक माध्यमांकडे त्यांनी आपल्या मनातील भावना उघड केलेली
नसली, तरी पक्षाच्या चार विधिमंडळ सदस्यांपैकी डॉ. तुषार राठोड आणि राजेश पवार हे उच्चविद्याविभूषित आमदार मंत्रिमंडळात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे; पण नव्या सरकारच्या स्थापनेचा मुहूर्त निश्चित झालेला नसल्याने त्यांनी आपली सुप्त इच्छा अद्याप उघड केलेली नाही. भाजप-शिवसेना युतीच्या 2014-19 दरम्यानच्या सत्ताकाळात या दोन पक्षांचे संख्याबळ 05 असतानाही दोन्ही पक्षांनी नांदेड जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. त्यावेळी चिखलीकर यांना शिवसेनेने शेवटपर्यंत संधी दिली नाही. शेवटी ते भाजपमध्ये गेले आणि खासदार झाले. डॉ. तुषार राठोड यांच्या मंत्रिपदासाठीही भाजपत प्रयत्न झाले; पण नेतृत्वाने तेव्हा त्यांना ‘वेटिंग’वर ठेवले. आता जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असले, तरी प्रत्येक जण आपले स्वतंत्र अस्तित्व जपत आला आहे. पक्षाचे जिल्ह्यातील नेतेपण खा. चिखलीकरांकडे असून पक्ष पुन्हा सत्तेत आला तर ते नेमके काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षनिष्ठा आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा दृष्टिकोन या निकषावर राम पाटील रातोळीकर यांचा एक पर्याय समोर आहे.

Back to top button