बीड : लुटीत फिर्यादी निघाला आरोपी | पुढारी

बीड : लुटीत फिर्यादी निघाला आरोपी

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : खामगाव- पंढरपूर महामार्गावरील पात्रूडनजीक चोरट्यांनी एका शेतकर्‍याची दुचाकी अडवून मारहाण करत साडेतीन लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. परंतु पोलिस तपासदरम्यान फिर्यादीने हा लूटमारीचा बनाव केल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीलाच ताब्यात घेतले.

माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी गजानन बाजीराव कोळसे व जनार्दन कोळसे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फोन करून आपल्याला रस्त्यात अडवून मारहाण करत चोरट्यांनी साडे तीन लाख रुपये लुटल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी ( दि.24) दुपारी हे दोघे दुचाकी वरून माजलगाव शहरात आले होते. पूर्णवादी बँकेतून साडेतीन लाख रुपयांची रक्कम काढून ते दुचाकीवरून खामगाव- पंढरपूर मार्गावरून परत गावी जात होते. यावेळी पात्रूड जवळील कालव्याजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना रस्त्यात अडवून जनार्दन यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. यावेळी मारहाण करत जवळील साडेतीन लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले, असे या तक्रारीत नमूद केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा
पंचनामा केला. संशय आल्याने केला तपास या घटनेचा तपास करताना पोलिसांना फिर्यादींचाच संशय आला. अधिक तपास केला असता फिर्यादीनेच या लुटमारीचा बनाव केल्याचे उघडकीस आले. यामुळे फिर्यादीच आरोपी झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन जनार्दन कोळसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला करत त्याला ताब्यात घेतले.

Back to top button