वादळातही शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य परभणी | पुढारी

वादळातही शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य परभणी

परभणी ःप्रवीण देशपांडे :  शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देणारा बालेकिल्ला शिवसेनेत उठलेल्या वादळातही अभेद्यच राहिला आहे. पक्षांतर्गत मोठी पडझड होत असतानाही जिल्ह्यातील शिवसेनेचे खा.संजय ऊर्फ बंडू जाधव व आ.डॉ.राहुल पाटील हे दोन शिलेदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आहेत.
खा.जाधव यांच्याबाबतीत गुरुवारी (दि.23) चर्चेला उधाण आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेत होतो, आहे व राहणारच या शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मातोश्री व शिवसेना भवनातील प्रत्येक बैठकांना हजर राहून आ.डॉ.राहुल पाटील यांनीही आपल्या शिवसेना निष्ठेचे दर्शन घडवून दिले आहे. 1986 पासून जिल्ह्यात शिवसेनेने गावपातळीपासून शाखा स्थापन करीत मोठी संघटनात्मक बांधणी केली. जय भवानी, जय शिवाजीचा नारा देत गावपातळीवरचा तरुण भगवा हातात घेऊन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येक शब्द आदेश मानून शिवसेनेत सर्वस्व पणाला लावत दाखल झाला. याचाच परिणाम 1989 मध्ये शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता नसतानाही अपक्ष म्हणून (कै.) अशोक देशमुख हे विजयी झाले. त्यानंतर 1991 च्या निवडणुकीत शिवसेनेला राज मान्यता मिळाली. धनुष्यबाण या चिन्हावर तेव्हापासून सुरू झालेला प्रवास लोकसभा निवडणुकीत 1998 चा तेरा महिन्यांचा अपवाद वगळता सातत्याने विजयरथावरच कायम राहिला. याचमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या जिल्ह्यावर मोठे प्रेम राहिले.

या दरम्यान अनेकजण पक्षात आले. राजकीय वारसा नसतानाही खासदार, आमदार झाले. काही जण निघूनही गेले. मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून देण्याचे काम येथील जनतेने व शिवसेनेवर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांनी सातत्याने केले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेत मोठे बंड झाल्यानंतरही त्याचा काडीमात्र परिणाम या जिल्ह्यावर झालेला नाही.

कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेले व एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख व त्यानंतर दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदार असलेले बंडू जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच भक्कमपणे कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. त्यांच्या बाबतीत गुरुवारी ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात गेल्याची माहिती दूरचित्रवाणी माध्यमांतून समोर आल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेत होतो, आहे व कायम राहणार. कोणाला कुठे जायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मात्र आपण पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2014 च्या व त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात विक्रमी मतांनी विजयी होणारे परभणीचे आ.डॉ.राहुल पाटील हे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. मागील आठ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात मोठमोठे कार्यक्रम घेण्याबरोबरच पक्षीय संघटन मजबूत करण्याचे काम आ.पाटील यांनी केले आहे. पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने शिंदेंच्या गोटात दाखल होत असताना आ.पाटील मात्र पहिल्या बैठकीपासूनच पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत.

गुरुवारी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत उपस्थित असलेल्या 14 जणांमध्ये आ.पाटील यांची उपस्थिती कायम होती. एक जीवन आणि एकच नेता म्हणजे शिवसेना, अशी भूमिका जाहीर करीत पक्षप्रमुखांसोबत अभेद्यपणे उभे राहण्याचे काम आ.पाटील यांनी केले आहे.

Back to top button