

हिंगोली ः गजानन लोंढे : एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसेनेतील यापूर्वी झालेल्या बंडाचा इतिहास पुन्हा चर्चील्या जात असून हिंगोली जिल्हा होण्यापूर्वी तथा हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले, त्यापैकी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना जनतेनेच नाकारल्या आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे शिवसेना सोडण्याचा विचार करणार्या नेत्यांना पुनर्विचार करावा लागतो.
राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठी बंडाळी म्हणून शिंदे यांच्या बंडाचा उल्लेख होतो. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे यांच्या बंडानंतर शिवसेना पुन्हा उभी राहिली. आता पुन्हा शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे असताना हिंगोलीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनेक नेत्यांना नंतर मात्र यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 1990 च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत विलास गुंडेवार हे हिंगोलीचे पहिले शिवसेनेचे खासदार निवडून आले केंद्रात नरसिंहराव यांचे सरकार असताना स्व. गुंडेवार यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतरच्या निवडणुकीत गुंडेवार यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले. परंतु त्यांचा पराभव झाला. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत अॅड. शिवाजी माने हे शिवसेनेकडून निवडून आले. पुन्हा 1999 च्या निवडणुकीत माने शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर त्यांनी 2005 मध्ये नारायण राणे यांच्यासोबत काँगे्रसमध्ये प्रवेश केला. माने यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक कळमनुरी मतदार संघातून लढविली. तेथेही त्यांचा पराभव झाला शिवसेना सोडल्यानंतर माने यांच्यावर विजयाचा गुलाल पडलाच नाही.
1991 च्या कळमनुरी विधानसभा निवडणुकीत मारुती शिंदे हे शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. परंतु तेही छगन भुजबळ यांच्या सोबत काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. शिंदे हे शेवटी राजकीय विजनवासात गेले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा सुभाष वानखेडे यांनी पराभव केला. शिवसेनेकडून निवडून आलेल्या वानखेडे यांनी पुन्हा 2019 ची निवडणूक काँग्रेसकडून लढविली. त्यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी जवळपास पावणे तीन लाख मतांच्या फरकाने पराभव केला. 1998 व 2014 चा अपवाद वगळता हिंगोली लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचा इतिहास पाहता शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारा उमेदवार पुन्हा जनतेने स्वीकारला नसल्याचे दिसून येते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेची पुरती वाताहात झाली असताना कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मात्र मातोश्रीशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे सर्वसामान्य शिवसैनिकांमधून स्वागत होत असून बांगर यांनी एकपक्ष, एकनेता या तत्त्वाला बांधील असल्याचे सांगत शिवसेनेची सत्ता हिंगोलीत अबाधित ठेवण्याचा विडा उचलला आहे.