हिंगोली : जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची वाणवा | पुढारी

हिंगोली : जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची वाणवा

गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा ः सेनगाव तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदासह शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जन वर विरजण पडत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्यामुळे पालकांत भीती निर्माण झाली आहे. येथील शाळेत शिक्षकांची पदे भरण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून युवकांनी भरपावसात उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाला तीन दिवस उलटूनही कोणताही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांनी भेट दिली नसल्याने गावात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गोरेगाव जि.प. शाळा शिक्षकाविना असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषदच्या शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे रिक्त जागेवर तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, सर्वात मोठे असलेले गाव गोरेगाव जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत अगोदरच विद्यार्थिसंख्या कमी असल्याने शाळा बंद पडण्याच्या
मार्गावर आहेत.

शाळा अखेरची घटका मोजत आहेत. केव्हा विचार करतील व चिमुकल्या मुलांना केव्हा शिक्षक मिळतील?, शिक्षक मिळणार की नाही, हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना शिक्षक मिळाले नाही तरी गरिबांच्या मुलांची खासगी शाळेत शिकण्याची ऐपत नसल्याने ‘शिकवा की नका शिकवू, आम्ही जिल्हा परिषद शाळेतच जाणार’ असे बोलके चित्र सेनगाव
तालुक्यातील गोरेगाव जिल्हा परिषद शाळेत पाहावयास मिळत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर विकासाचे तुणेतुणे वाजवणारे नेते शाळेसाठी आवाज का काढत नाहीत, असा प्रश्न जनतेतून होत आहे उच्चश्रेणी
मुख्याध्यापकांचे पद रिक्त आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी श्याम रणबावळे यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्याने सोमवारपासून जिल्हा परिषद शाळेपुढे उपोषणाला सुरवात केली असून, अद्यापही कोणत्याही लोकप्रतिनिधींनी भेट दिली नसल्याने गावात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे

Back to top button