नांदेड : सात दिवसांत महामार्गाच्या रुंदीचा निर्णय होणार | पुढारी

नांदेड : सात दिवसांत महामार्गाच्या रुंदीचा निर्णय होणार

किनवट, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या दालनात पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संनियंत्रण समितीची सभा सोमवारी (दि.20) घेण्यात आली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेऊन येत्या आठवड्याच्या आत महामार्गाच्या रुंदीविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या वेळी माजी आमदार प्रदीप नाईक, पुसदचे उपवनसंरक्षक ए. एल.सोनकुसरे, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार, पांढरकवडाचे उपवनसंरक्षक किरण जगताप, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता साहुत्रे, उपअभियंता हटकर यांची विशेष उपस्थिती होती.

किनवट शहर व तालुक्यात निर्माणाधीन असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 (ए) ची रुंदी चुकीच्या पध्दतीने ‘इको सेन्सेटीव्ह झोन’ चे निमित्त करत शहरातील जिजामाता चौक ते अशोकस्तंभ च्या दरम्यान 30 मीटर ऐवजी 18 मीटर करण्यात आली होती. ज्यामुळे गोकुंदा येथील रेल्वे ओव्हरब्रीज होऊ शकत नव्हता. कारण रेल्वे ओव्हरब्रीजकरिताकिमान 30 मीटर रुंदीचा मार्ग आवश्यक असतो. त्यामुळे भविष्यातील किनवट तालुक्याची दळणवळाची गरज पाहता माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह विद्यमान आ.भीमराव केराम यांनीही महामार्गाची रुंदी वाढवण्याकरिता पुढाकार घेऊन संबंधितांच्या ज्या विविध बैठका घेण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये आजी व माजी आमदारांनी लोकहिताची भूमिका घेऊन त्यात राजकारण येऊ दिले नाही. आजी व माजी आमदारांनी शहरात महामार्गाची रुंदी ही 30 मीटरच व्हावी, अशी भूमिका घेऊन नियोजन केल्यामुळे व प्रशासनाचीही साथ मिळाल्याने उपरोक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैनगंगा पर्यावरण सनियंत्रण क्षेत्र समितीच्या सभेमध्ये समितीचे अध्यक्ष अमोल येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ, समितीचे सचिव ए. एल. सोनकुसरे उपवनसंरक्षक यवतमाळ यांच्या प्रमुख
उपस्थितीमध्ये सर्व यंत्रणाची सांगड घालत व सगळ्या डॉक्युमेंटची तपासणी करून दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले.

महामार्गाची रुंदी 30 मीटर करताना ज्यांच्या मालमत्तेला बाधा पोहोचत होती, त्यांच्याकडून किनवट महामार्ग संघर्षसमितीचे प्रतिनिधी म्हणून माजी उपनगराध्यक्ष यादवराव नेम्मानीवार यांचेसह संघर्षसमितीचे पदाधिकारी देखिल आपली बाजू मांडण्याकरिता यावेळी उपस्थित होते. अखेर आठवडाभरात महामार्ग रुंदीकरणाबाबत आम्ही योग्य ते निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी अमोल
येडगे यांनी सांगितले. माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, शिवसेनेचे व्यंकट भंडारवार, रा.काँ.चे ता.अध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा परिषद सदस्य प्रविण म्याकलवार, राहुल नाईक, डॉ. रोहिदास जाधव, कचरु जोशी , संजीत बॅनर्जी यांची उपस्थिती होती तर किनवट संघर्ष समिती तर्फे यादवराव नेम्मानीवार, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, सुनिल वट्टमवार, अ‍ॅड. दिलिप कोट्टावार, नौशाद खान, गिरिश नेम्मानिवार, किशन राकोंडे, सुशिल जन्नावार आदींची उपस्थिती होती

Back to top button