बीड : सत्तर वर्षांपासून जपला शास्त्रीय संगीताचा वारसा | पुढारी

बीड : सत्तर वर्षांपासून जपला शास्त्रीय संगीताचा वारसा

परळी; रवींद्र जोशी : काशी येथील संगीताची गंगा मराठवाड्यातील परळीत आणून चौधरी घराण्याचे 70 वर्षांपासून शास्त्रीय संगीताचा वारसा जपला आहे. पंडित गणेश चौधरी यांनी 70 वर्षांपूर्वी परळीत पहिले शास्त्रीय संगीत केंद्र निर्माण केले. आजतागायत हा संगीताचा वारसा त्यांनी जपला आहे.

शास्त्रीय संगीत कलेला लोकाश्रय देऊन त्या परंपरेचे जतन करणारा परळीतील भक्ताश्रम सर्व परिचित आहे. गेल्या 70 वर्षात भक्ताश्रमाने जुन्या- नव्या कलावंतांचा समन्वय, सादरीकरण, संगीत मैफलींचे दस्तऐवजीकरण आणि प्रशिक्षणाद्वारे संगीतसेवा सुरू ठेवली. अभिजात कलेचा वारसा जपणार्‍या या भक्ताश्रमातून आजतागायत हजारो संगीतज्ञ निर्माण झाले आहेत. पंडित गणेशअण्णा चौधरी यांच्या पुढाकाराने 1960 मध्ये विदेही सांगितालय या संगीत केंद्राची स्थापना झाली. चौधरी घराण्यातील सर्वांनी नि:स्वार्थ वृत्तीने आजपर्यंत योगदान दिले.

भक्ताश्रमाच्या या जुन्या वास्तूला देशातील नामवंत गायक- वादकांच्या संगीत आविष्काराचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे. या विद्यालयात हजारो विद्यार्थी तज्ज्ञ शिक्षकांकडून हार्मोनियम, गायन, तबला, बासरी तसेच संगीताच्या विविध पैलूंचे शिक्षण घेऊन संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. परळी येथील जुन्या भागात गणेश पार येथे गोराराम मंदिराच्या शेजारी भक्ताआश्रम कार्यरत आहे. आकाशवाणी केंद्रावरील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबलावादक स्वर्गीय पंडित सतीशचंद्र चौधरी यांची जडणघडण याच भक्त आश्रमात झाली. आपल्या वडिलांचा वारसा त्यांनी पुढे नेटाने चालवला. आजही त्यांच्या पुढील पिढीतील सर्वजण संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.

भक्ताश्रम संगीतप्रेमींचे माहेरघर

प्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, श्री नाकोडा यांना संगीत मैत्रीमध्ये उत्तम संगीत साथ देणारे तबलावादक पंडित सतीशचंद्र चौधरी यांनी आश्रमाच्या माध्यमातून संगीताचा वारसा यशोशिखरावर नेला. डॉक्टर लावण्यवती चौधरी पाटील व चौधरी परिवारातील अन्य सर्व सदस्यांची आजही संगीत आराधना सुरू आहे. यामुळेच परळीतील भक्ताआश्रम संगीत प्रेमींचे माहेरघर ठरले आहे.

Back to top button