

जिंतूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील साईनगर तांड्यावरील गोकर्णा सचिन राठोड (Gokarna Rathod) देशसेवेसाठी सीआरपीएफ मध्ये दाखल झाली. ११ महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून ती जिंतूर तालुक्यातील साईनगर तांड्यात परतली. यावेळी तिचे गावकरी, व नातेवाईकांनी ढोलताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. फटाक्याची आतषबाजी व डिजेच्या तालावर नाचत गाजत गावातून तांड्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
गोकर्णा परमेश्वर चव्हाण (Gokarna Rathod) (रा. वडचुना, ता. औंढा, जि. हिंगोली) येथील असून काही वर्षापूर्वीच तिचे लग्न जिंतूर तालुक्यातील साईनगर तांडा येथील सचिन प्रकाश राठोड यांच्याशी झाले . लग्न झाल्यानंतर सासरी आलेल्या सासू-सासर्यांनी गोकर्णाला पुढील शिक्षण घेण्याची परवानगी दिली.
त्यानंतर तिने आढोळ येथील उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला. सासू-सासर्यांचा विश्वास सार्थ ठरवत ती बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाली. मनामध्ये देशसेवा करण्याची जिद्द असल्याने शेतामध्ये काम करत करत आपल्या अभ्यास सुरूच ठेवला.
प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर गोकर्णा आपल्या घरी आल्यावर तिने सर्वप्रथम सासू-सासर्यांना सॅल्यूट केला. सासर्यांच्या डोक्यावर आपल्या डोक्यातील सैनिक टोपी घातली. या भावूक क्षणामुळे उपस्थित नातेवाईक व गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गोकर्णा हिच्या स्वागतासाठी गोर सेनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच विजय आढे, प्रकाश राठोड, अमोल जाधव, हरिदास राठोड, विनोद राठोड, विकास राठोड, कोंडीराम जाधव, बबन चव्हाण, राजू राठोड, गणेश चव्हाण, सचिन राठोड, अविनाश आढे, पंढरीनाथ जाधव, भालचंद्र राठोड आदीसह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?