नांदेड : चाकूचा धाक दाखवत केली लोखोंची लूट, दोन लुटारू महिला जेरबंद | पुढारी

नांदेड : चाकूचा धाक दाखवत केली लोखोंची लूट, दोन लुटारू महिला जेरबंद

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : चाकूचा धाक दाखवून मोबाईल, दुचाकी आणि रोख रक्कम हिसकावून पळ काढणार्‍या दोन महिला लुटारू आणि एका पुरूष लुटारूला शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे १ लाख ६० हजार ४१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माधव अप्पाराव मोरे हे बुधवार, (दि. १)  रोजी दत्तानगर येथील खासगी रुग्णालयाकडे जात असताना रेल्वेपटरीजवळ त्यांनी दुचाकी उभी करून लघुशंकेसाठी गेले असता दोन महिला आणि एका पुरुष आरोपीने त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील ३ हजार ४०० रुपये रोख, १२ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल आणि ५० हजार किंमतीची दुचाकी हिसकावून त्याच दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख रवी वाहुळे यांच्याकडे देण्यात आला होता. आरोपींचा शोध घेत असताना दोन महिला आरोपी अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. गंगासागर उर्फ माया माथेकर आणि सिमा संतोष निळकंठे या दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांचा विचारपूस केली असता दोघींनी गुन्ह्याची कबुली देऊन सर्व मुद्देमाल परत केला.

याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेले ७ मोबाईल ज्यांची किंमत ९४ हजार ५१९ रुपये आहे. असा एकूण १ लाख ६० हजार ४१९ रुपयांचा मुद्देमाल या महिलांकडून जप्त केला. यातील पुरूष आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पो.काँ. शेख इब्राहिम, रवी बामणे, दिलीप राठोड, देवीसिंघ सिंगल, शेख अजहर यांचाही तपास पथकात समावेश होता.

हेही वाचलंत का?

Back to top button