ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो, शिवराजसिंह चौहानांचा उद्धव ठाकरेंना टोमणा | पुढारी

ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो, शिवराजसिंह चौहानांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

परळी वैजनाथ (बीड), पुढारी वृत्‍तसेवा : परळीत गोपीनाथगडावर आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्‍थित होते. यावेळी बोलताना ते म्‍हणाले, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे अविरत संघर्ष, साहस आणि वंचित घटकांची सेवा याचा त्रिवेणी संगम आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया असे चौहान म्‍हणाले.

गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी सुरूवातीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्‍यानंतर  संघर्ष सन्मान म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “संघर्षदिन सन्मान” करण्यात आला आहे. यामध्ये उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर,ललिता वाघ यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना ते म्‍हणाले की, मी आज गोपीनाथ गडावर एक भाजपाचा नेता किंवा मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून नाही, तर स्वर्गीय मुंडे यांचा भाऊ म्हणून उपस्थित राहत आहे. भाजपाचे मजबूत संघटन आज देशभरात दिसून येते या संघटनाला महाराष्ट्रात गावागावापर्यंत पोहचवण्याचे कार्य स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी केले. मध्यप्रदेशमध्ये काम करताना सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनीच आपल्याला अध्यक्ष म्हणून पक्षात संधी दिली आणि मुंडे-महाजन यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. अगदी जवळून यांचे काम काम पाहिले आहे.

पुढे बोलताना ते म्‍हणाले की, वंचित, उपेक्षित, पिडीत घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी जीवनभर केले. गोपीनाथ मुंडे स्वतः गरीब परिवारातून आल्याने गरीबीच्या झळा अनुभवतच त्यांनी राजकारणात गरिबांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी अविरत संघर्ष केला. गोरगरिबांना न्यायासाठी ते जेवढे प्रेमळ होते, तेवढेच गुंडशाही झुंडशाहीच्या विरुद्ध वज्राप्रमाणे कठोर होते. त्यांनी हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना दाखवून दिले हाेते.

संघर्ष, साहस व सेवा हा त्रिवेणी संगम या लोकनेत्यामध्ये नक्कीच बघायला मिळतो. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊनच जनकल्याणाचे कार्य अविरत त्यांच्या मुली करत असल्याचे कौतुकास्पद आहे. आपण सारे मिळून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जनसेवेचा हा वारसा निश्चित पुढे चालवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंकजा मुंडे या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांना जपा, त्यांच्यामागे पाठबळ उभे करा, निश्चितच पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणेच जनसेवेचा वारसा पुढे चालू राहील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षणाच्या विषयावर बोलताना, मध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षण द्यायचेच असा आपला ठाम निर्धार होता. न्यायालयांमध्ये यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन बाजू मांडली. आयोग, प्रशासन व स्वतः दिवस-रात्र एक करून ओबीसींना आरक्षण मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसलो नाही. मनातून काही द्यायचे असेल तर ती तडफ आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर निश्चित मार्ग निघतो. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचा नक्कीच विचार करावा असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा  

Back to top button