हिंगोली : रिधोरा पाटीजवळ पिकअप उलटून तरुण ठार, ६ जखमी | पुढारी

हिंगोली : रिधोरा पाटीजवळ पिकअप उलटून तरुण ठार, ६ जखमी

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते सेनगाव मार्गावर रिधोरा पाटीजवळ भरधाव पिकअप उलटून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला, तर सहाजण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.२२) दुपारी एक वाजता घडली. योगेश बंडू लाड ( वय २२, रा. अंजनी बुद्रुक, ता. मेहकर) असे अपघातात ठार झालेल्‍या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विदर्भातील अंजनी बुद्रुक येथील काही जण पिकअपने रविवारी दुपारी कार्यक्रमासाठी नरसी नामदेव येथे येत होते. यावेळी रिधोरा पाटीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला. या अपघातामध्ये याेगेश लाड ठार झाला तर सहा जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सेनगांव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठोके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. पोटे, जमादार हेमंत दराडे, जमादार पी. जी. डवले, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी अपघातातील मयत योगेश लाड व जखमी असलेले रामदास श्रीरंग बोरोडे (वय ४०),  नागेश गजानन पायघन (१८), लक्ष्मण श्रीकृष्ण पारोडकर (२६), विष्णू दत्तराव टोणवे (२६), सुरेखा श्रीकृष्ण पायघन (४५), आकाश संतोष लाड ( २६) यांना उपचारासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माने यांच्या वाहनाने तर काही जणांना रुग्णवाहिकाद्वारे तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

हिंगोली ते सेनगाव हा राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. मागील तीन दिवसात या मार्गावर चार  ठार, तर ६ जण जखमी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी राहोली पाटीजवळ अपघातात एक जण ठार झाला. त्यानंतर शनिवारी ब्रह्मपुरी पाटीजवळ अपघातात दोघे जण ठार झाले होते.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button