परभणी : बोरकीनीत गोठ्याला आग लागून सहा शेळ्यांचा होरपळून मृत्यू | पुढारी

परभणी : बोरकीनीत गोठ्याला आग लागून सहा शेळ्यांचा होरपळून मृत्यू

परभणी; पुढारी वृत्तसेवा : सेलू तालुक्यातील बोरकीनी येथील एका शेतातील जनावरांच्या गोठ्यास अचानक आग लागल्याने सहा शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत शेतीच्या औजांरासह इतर साहित्य जळून खाक झाले. हि दुर्घटना शनिवारी दुपारी २:३० च्या सुमारास घडली.

बोरकीनी येथील विष्णू हावळे यांचे गावालगत शेत आहे. या शेतावरील गोठ्यात नेहमीप्रमाणे दुपारी उन्हामुळे जनावरे बांधली होती. शनिवारी दुपारी गोठ्यास अचानक आग लागली. कमीवेळेत या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान घटनास्थळी परिसरातील शेतकरी हरिभाऊ हावळे, सुरेश आघाव, पांडुरंग हावळे, दामोधर हावळे, उद्धव हावळे यांनी धाव घेतली. त्यांनी बैलाचे दावे तोडून त्यांना बाहेर काढले. पण सहा शेळ्याचा मात्र या आगीत होरपळून मृत्यू झाला. तर शेती औजारे व इतर साहित्य जळून खाक झाले. आग विझवताना काही जणांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली. तर बैलांनाही आगीची झळ लागल्याने त्यांच्यावर उपचार केले आहेत.

विष्णू हावळे यांनी घटनेची माहिती सेलू तहसील कार्यालय व चारठाणा पोलीस ठाण्यास दिली आहे. यावेळी त्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

Back to top button