बीड : प्रवासी साखरझोपेत असताना रेल्वे क्रॉसिंगवर चोरट्यांचा धुमाकूळ; प्रवासी महिलांचे दागिने पळवले | पुढारी

बीड : प्रवासी साखरझोपेत असताना रेल्वे क्रॉसिंगवर चोरट्यांचा धुमाकूळ; प्रवासी महिलांचे दागिने पळवले

परळी वैजनाथ ; पुढारी वृत्तसेवा परळी- परभणी मार्गावरील वडगाव येथे रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत प्रवाशांचे दागिने पळवल्याची घटना आज (दि.१९) पहाटेघडली. या घटनेने रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिर्डी-सिकंदराबाद एक्सप्रेस मध्ये पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. परळी-परभणी मार्गावरील वडगाव (स्टे.) येथे रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान गाडी थांबली असताना खिडकीतून हात घालत आतील पाच प्रवाशी महिलांच्या गळ्यातील दहा तोळे सोने हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. गंगाखेड रेल्वे मार्गावर असलेल्या वडगाव निळा येथील रेल्वेची क्रॉसिंग असल्याने शिर्डी -सिकंदराबाद रेल्वे काही मिनिटे थांबली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी खिडकीतून आत हात घालत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले, अशी माहिती औरंगाबादहून उदगीरकडे प्रवास करणाऱ्या श्रीनिवास सोनी यांनी दिली.

कमलनगर जिल्हा बिदर येथील एका महिलेच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र शिर्डी – सिकंदराबाद रेल्वे गाडीतून चोरीस गेले आहेत. या प्रकरणी महिलेच्या पतीने उदगीर येथील रेल्वे पोलीस चौकित फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून  चोरट्या विरुद्ध परळी रेल्वे पोलीस ठाण्यात आज (मंगळवार) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या विषयीची माहिती परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. घटनास्थळी रेल्वे पोलीस स्टेशन परळी व आर पी एफ च्या अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी भेट दिली. या घटनेने प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Back to top button