मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी | पुढारी

मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी

कळंब (जि.उस्मानाबाद) पुढारी वृत्तसेवा : सध्या उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत असून, सुर्य आग ओकु लागल्याने घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यातच तालुक्यातील हासेगाव ( केज ) येथील लिंबराज तुकाराम सुकाळे (वय ५०) या भुमिहीन शेतकऱ्याचा गुरूवारी (दि.३१) दुपारी चार वाजता उष्माघाताने मृत्यू झाला. मराठवाड्यातील हा उष्माघाताचा पहिलाच बळी ठरला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका हा ‘हिट वे’ मध्ये येतो. अती उष्णतेमुळे या भागातील नागरिकांना प्रशासनातर्फे खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शेती हे काम शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजल्याने यापासून त्याची सुटका होणे अशक्य आहे. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हाने जीव कासावीस होत असून, उष्णतेचा पारा ४० अंश पार गेला आहे. यामुळे घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे.

लिंबराज सुकाळे हे सकाळपासून गावातच घरासाठी शेड मारत होते. चार वाजता ते त्यांच्या रहात्या घरी गेल्यावर त्यांना दारातच चक्कर आली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना काही समजेना म्हणून उपचारासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना नेले असता, डॉ. आदमपुरकर यांनीत त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले.

लिंबराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ते भुमीहीन होते आणि मजुरी करून कुटुंबाची उपजिविका करत होते. कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button