हिंगोली : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकरांचे निलंबन | पुढारी

हिंगोली : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकरांचे निलंबन

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते.

हुंडेकर यांच्या निलंबनाचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी रात्री उशीरा काढले. या आदेशामुळे परिक्षेत्रीय पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत शेवाळा शिवारात अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कार्यालयास मिळाली होती.

त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकून ४.८७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

या प्रकरणी सात जणांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिस अधिक्षक कलासागर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचा कसुरी अहवाल सादर केला होता.

त्या अहवालावरून हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबाळी काढले आहेत.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय चालतात, तसेच वाहनांवर जुगार खेळणारे येतात याची माहिती स्थानिक पोलिस अधिकार्‍यांना मिळत नाही.

यामुळे पोलिस अधिकार्‍यांचा निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट होतो असेही या आदेशात नमुद केले आहे.

त्यांना पोलिस नियंत्रण कक्ष हे मुख्यालय देण्यात आले आहे. दरम्यान, मागील पंधरवड्यात नांदेड परिक्षेत्रात हिंगोली, नांदेड, परभणी, लातुर या जिल्हयांमधून एकाच वेळी अवैध व्यवसायावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु झाले होते.

मात्र, आता या कारवाईमुळे परिक्षेत्रातील ठाणेदार व बीट जमादारांचे धाबे दणाणले आहे.

हुंडेकरांच्या रूपाने तांबोळी यांच्या निदर्शनास अवैध धंदे आले असले तरी इतर ठाण्यांतर्गतही मटक्यासह जुगार राजरोसपणे सुरू आहे.

विशेष म्हणजे औंढा नागनाथ, हट्टा, वसमत ग्रामीण, बासंबा, सेनगाव, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादानेच हा संपुर्ण प्रकार सुरू असल्याची ओरड अनेकदा झाली असली तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र या संपूर्ण प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.

इतर ठाणेदारांवरही विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांचीही नजर जाणे गरजेचे आहे. विशेष पथके नेमून अवैध धंद्यांचा भंडाफोड करण्याची गरज असल्याची चर्चाही झडू लागली आहे.

दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस स्टेशनचा चार्ज वसमत येथून आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांनी घेतला आहे.

Back to top button