औरंगाबाद : सुशोभित नदीपात्र झालं राजकीय अड्डा, ‘आदित्य’ सरोवर, ‘खैरे’ लॉन, ‘दानवे’ उद्यान आणि बरचं काही | पुढारी

औरंगाबाद : सुशोभित नदीपात्र झालं राजकीय अड्डा, ‘आदित्य’ सरोवर, ‘खैरे’ लॉन, ‘दानवे’ उद्यान आणि बरचं काही

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने विविध संस्था, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खाम नदीचे पुनरुज्जीवन केले आहे. नदीपात्रात पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचे सरोवर, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाने ‘ऑक्सिजन हब’, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाचे योग लॉन, आमदार अंबादास दानवे यांच्या नावाने फुलपाखरू उद्यान तर रफिक झकेरिया यांच्या नावाने प्रकाश योजना सुरू करण्यात आली आहे. (Aurangabad)

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुशोभित नदीपात्राचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता मनपा प्रशासकांवर टीकेची झोड उठली आहे. महापालिकेतर्फे वर्षभरापासून खाम नदीच्या पुनरुज्जीवनाअंतर्गत कामे सुरू होती. बुधवारी या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी ठाकरे म्हणाले की, खाम नदीचे सौंदर्य व निसर्गरम्य परिसर बघून याठिकाणी फिरावे वाटते, खामनदी पुनरुज्जीवित होईल, असा विचार केला नसेल; पण खऱ्या अर्थाने शहराचा शाश्वत विकास झाल्याचे येथे पाहायला मिळाले.

Aurangabad : छावणी परिषदेचे ठाकरे यांच्याकडून कौतुक

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना अभिमान वाटला असता, शासनाचा एक पैसाही खर्च न करता खाम नदीचे पुनरुज्जीवन करून गतवैभव मिळवून दिल्याबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय व इको सत्त्व, व्हेरॉक कंपनी, छावणी परिषदेचे ठाकरे यांनी कौतुक केले.

प्रारंभी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी माहिती दिली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुभाष ऑक्सिजन हब येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आदित्य सरोवर, उन्नती सरोवर, डॉ. रफिक झकेरिया खाम नदी प्रकाशयोजना, चंद्रकांत खैरे योग लॉन, अंबादास दानवे फुलपाखरू उद्यान, व्हेरॉक एफीथिएटर व हॉलीबॉल ग्राउंडचे उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, छावणी परिषदेचे सीईओ विक्रांत मोरे, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सौरभ जोशी, इको सत्त्वाचा नताशा झरिन, गौरी मिराशी, व्हेरॉकचे सतीश मांडे, विजय पाटील, देविदास पंडित यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

Back to top button