Latur Nagar Panchayat election : लातूर जिल्ह्यात नगरपंचायतीसाठी मतदारांचा संमिश्र कौल | पुढारी

Latur Nagar Panchayat election : लातूर जिल्ह्यात नगरपंचायतीसाठी मतदारांचा संमिश्र कौल

लातूर; पुढारी वृतसेवा : लातूर जिल्ह्यात झालेल्या चार नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून दोन नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. तर एका ठिकाणी एकावर भाजपाचे कमळ फुलले आहे. एका नगर पंचायतीचा निकाल त्रिशंकू लागला आहे. (Latur Nagar Panchayat election)

१७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जळकोट नगरपंचायतीमध्ये भाजपला धक्का देत महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. काँग्रेस ०७, राष्ट्रवादी काँग्रेस ०४, शिवसेना ०२, अपक्ष ०३ व भाजपा ०१ असे बलाबल आहे. जळकोटमध्ये आघाडीच्या नेत्यांनी मोठा जोर लावला होता. पालकमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सभा झाल्या होत्या तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तर निवडणुकीवेळी तळ ठोकूनच बसले होते.

देवणी नगरपंचायतीसाठी १७ जागांकरीता निवडणूक झाली. यात काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती तर शिवसेनेने स्वतंत्र लढत दिली होती. यात काँग्रेसने १२, राष्ट्रवादी ०२, अपक्ष ०२ तर भाजपाने ०१ जागेवर विजय मिळवला. स्वतंत्र लढत देणाऱ्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे.

दरम्यान मागच्या वेळी भाजपने ८ जागा जिंकून अपक्षाच्या मदतीने नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले होते. या निवडणुकीत मात्र भाजपला दारून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पालकमंत्री अमित देशमुख, अशोक पाटील निलंगेकर व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देवणी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर विशेष लक्ष दिल्याने जास्त जागा निवडून आल्याचे बोलले जात आहे.

Latur Nagar Panchayat election : १५ प्रभागांमध्ये नगरसेवकांना समान मते

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीचा निकाल त्रिशंकू लागला असून १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान १५ प्रभागात राष्ट्रवादी व प्रहार जनशक्तीच्या उमेदवारांना समान मते पडल्याने त्यांच्यात चिठ्ठी काढण्यात आली त्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाले.

सत्तेत असलेल्या भाजपाला मात्र केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपतील अंतर्गत बंडाळीचा हा फायदा महाविकास आघाडीला झाल्याची चर्चा आहे. प्रहार जनशक्तीची ०६ जागांवर सरशी झाली असली तरी त्याचे पॅनल प्रमुख विठ्ठलराव माकणे व त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने त्यांची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.

१७ जागांसाठी झालेल्या शिरुर अनंतपाळ नगर पंचायत निवडणूकीत भाजपाचे कमळ फुलले असून सत्तेतील सातत्य त्यांना कायम ठेवण्यात यश आले आहे. भाजपा ०९, शिवसेना ०४ , राष्ट्रवादी ०३ व काँग्रेस ०१ असे बलाबल आहे.

Back to top button