उमरखेड, पुढारी वृत्तसेवा
येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे (वय 45) यांची आज (मंगळवार) सायंकाळी पाच वाजता गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलच्या समोरून रुग्णालयात जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या युवकाने त्यांच्या दिशेने तीन ते चार गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश मांडण व त्यांच्या सहकार्यांनी उपचार सुरू केले, पण त्यास प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
धर्मकारे मागील सात वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. या शिवाय त्यांचे उमरखेड बसस्थानकाच्या समोर खासगी बाल रुग्णालय आहे. गेल्या सात वर्षांच्या काळात त्यांची कारकीर्द अतिशय सर्वसमावेशक राहिली आहे. या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नसताना ही घटना घडल्याने शहरवासीयांना धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती कळताच माजी गृह राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार नामदेव ससाणे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी हे घटनास्थळी आले. डॉ. धर्मकारे हे नांदेड येथील रहिवासी असून, त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.