हिंगोली: तुरीपाठोपाठ हळदीनेही गाठला क्विंटलला १० हजारांचा दर

हिंगोली: तुरीपाठोपाठ हळदीनेही गाठला क्विंटलला १० हजारांचा दर
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात तुरीपाठोपाठ हळदीनेही क्विंटलला १० हजारांचा पल्ला गाठला. मार्केट यार्डात जवळपास पाच हजार क्विंटलची आवक झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आषाढी एकादशी व बकरी ईदनिमित्त हळद मार्केट यार्डातील खरेदी-विक्रीचे व्यवहार २७ जूनपासून बंद ठेवण्यात आले होते. सहा दिवसांनंतर ३ जुलैपासून या ठिकाणचे व्यवहार सुरू झाले.

यासंदर्भात बाजार समितीने दोन दिवस आधीच सूचना दिल्याने रविवारपासूनच शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती. लिलावाच्या आदल्या दिवसापासून रांगा लागल्याने हळदीची आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाच हजार क्विंटलची आवक झाली. ८ हजार ८०० ते १० हजार रुपयांपर्यंत हळदीचा भाव गेला. दरम्यान, मोंढ्यात गत आठवड्यात तुरीला १० हजार रूपये क्विंटलचा भाव मिळाला होता. त्यानंतर यंदा हळदीनेही १० हजारांचा टप्पा गाठला आहे. भाव वधारल्याने हळद उत्पादकांत समाधान व्यक्त होत आहे. गत आठवड्यात २६ जूनरोजी हळदीला ७ हजार ६५० रुपये सरासरी भाव मिळाला होता.

त्यानंतर सहा दिवस मार्केट यार्ड बंद राहिले. सोमवारी हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत झाले. या दिवशी क्विंटलमागे जवळपास एक ते दीड हजाराने दर वधारले. सरासरी ९ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलने हळद विक्री झाली. संत नामदेव हळद मार्केट यार्डाच्या आवारात जवळपास दोनशेंवर वाहने दाखल झाली आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रॅक्टर, पीकअप, टेम्पो, ट्रकद्वारे हळद विक्रीसाठी आणण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने वाहने लिलाव आणि मोजमापासाठी सोडण्यात येत आहेत. मार्केट यार्डात एका दिवसात जवळपास अडीच ते तीन हजार क्विंटल हळदीचे मोजमाप होऊ शकते. सोमवारी मात्र जवळपास पाच हजार क्विंटलवर हळद दाखल झाल्याने मोजमापासाठी मंगळवारचा पूर्ण दिवस लागणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एक दिवस मुक्काम ठोकावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news