Maharashtra Rain Updates |राज्यातील अनेक भागात पूरस्थिती गंभीर, आणखी २ दिवस पावसाचेच

कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Rain Updates live
राज्यातील अनेक भागाच पुरस्थिती गंभीरPudhari

निपाणीनजीक कोणत्याही क्षणी होणार एकेरी महामार्ग बंद

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाट्याजवळ कुंभार शेताजवळ महामार्गाला पर्याय म्हणून सुरू ठेवलेल्या सर्विस रोडवर वेदगंगेच्या नदीपात्रातील बॅक वॉटरचे पाणी आले आहे. कोणत्याही क्षणी कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासनाने लहान वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे केवळ मालवाहतूक वाहने, बसेस वाहतूक सुरु आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास वेदगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुपारपर्यंत बॅकवॉटरचे पाणी पर्यायी सर्विस रोडवर येऊन कोणत्याही क्षणी प्रशासनाला एकेरी वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. (Nipani Flood Updates)

कुलाबा किल्ला परिसरात मालवाहू जहाज भरकटले

अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात गुरुवारी (दि.२५ ) मालवाहू जहाज भरकटले होते. त्यातील खलाशी काढण्याचे सर्च ऑपरेशन कोस्ट गार्ड कडून चालू आहे.

Kolhapur Rain : पंचगंगेची राजाराम बंधारा पाणी पातळी- ४४ फूट १० इंच

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग केला कमी

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सकाळी ७ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी दक्षता बाळगावी.

- कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे

पानशेत धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होणार

पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून पानशेत धरण जलाशय ८३ टक्के क्षमतेने भरले आहे. धरणात पाण्याची आवक वाढत गेल्यास परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून किंव्हा विद्युत निर्मिती केंद्रामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील परीक्षा पुढे ढकलल्या

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आजच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालक पूजा रौदळे यांनी दिली आहे.

अलिबाग समुद्रात अडकलेल्या १४ जणांना हेलिकाॅप्टरने वाचवले

धरमतर येथून जयगडला जात असताना अलिबागजवळ समुद्रात जहाज काल (दि.२५ जुलै) भरकटले होते. यामधील १४ क्रू मेंबर्संना आज (दि.२६ जुलै) कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करुन त्यांना लिफ्ट करुन वाचवले आहे.

आज सकाळी ८.५६ ते ९.५८ या वेळेत हे बचावकार्य राबवण्यात आले. यावेळी हेलिकाॅप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करुन सर्व १४ क्रु मेंबर्संना वाचवण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणी समुद्रावर केली असता ते मेडिकली फिट असल्याची माहिती समोर आली आहे.

Kolhapur Flood : गारगोटी-कोल्हापूर मार्गावर सर्व वाहतूक बंद

गारगोटी-कोल्हापूर मार्गावर मडिलगे नजीक रस्त्यावर पाणी आल्यामुळे गुरुवारी सायंकाळी सात वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुर म्हसवे मार्गे गारगोटी अशी वाहतूक सुरू होती, मात्र महालवाडी नजीक टेंम्पो रस्त्यात अडकल्यामुळे या मार्गावरीलही वाहतूक काही काळ बंद झाली होती. टेम्पो काढल्यानंतर वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली. या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तुरळक स्वरूपात हासुर मार्गे कोल्हापूर अशी गारगोटी आगाराची एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.(Kolhapur Flood)

मुंबई विद्यापीठाच्या 'या' जिल्ह्यांतील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आज शुक्रवारी (दि.२६) सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या या दोन जिल्ह्यांतील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाने X ‍‍‍‍‍‍वर पोस्ट करत दिली आहे. (Raigad Ratnagiri Flood News)

तुळशी धरण ९० % भरले, धरणातून विसर्ग सुरू

तुळशी धरण परिसरात गेल्या पंधरा दिवसांत २६९६ मि. मी इतका पाऊस झाला आहे, तर गेल्या चोवीस तासात २०१ मि. मी इतका पाऊस झाला आहे. धरण पहिल्यांदाच जुलै महिन्यात भरले आहे. धरणाची पुर्ण संचय पातळी ६१६.९१ मीटर असुन धरणाची सद्याची पाणी पातळी ६१५.०२ इतकी आहे. या परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने ओढ्या, नाल्यांना पूर आला आहे. तुळशीतुन पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे.

पावसाचा जोर कमी; राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद

राधानगरी : राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. त्यामुळे आज सकाळी ५ वा. खुला झालेला एक क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणाचे पाच दरवाजे खुले असून या दरवाजातून ७१४० क्यूसेक तर पॉवर हाऊसमधून १५०० असा एकूण ८६४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.

आणखी २ दिवस पावसाचेच ; कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा

राज्यातील घाट क्षेत्र आणि मध्य महराष्ट्रातील काही भागात पुढील २ दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा आणि गुजरात राज्यात आज (दि.२६ जुलै) पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर पाऊसाचे प्रमाण कमी येईल. तसेच पुढील २ दिवसांत मध्य भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्याला झोडपून काढले आहे, राज्यात अनेक भागात पूरस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, राज्यातील घाट क्षेत्र आणि मध्य महराष्ट्रातील काही भागात पुढील २ दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain Updates live)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news