Maharashtra Rain Alert: आजही पावसाचा जोर कायम! पुढील 24 तासांसाठी IMD चा गंभीर इशारा; अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain AlertPudhari
Published on
Updated on

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तास राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः घाटमाथा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहा दिवसांत महिनाभराच्या पावसाची नोंद

यंदा मान्सून उशिरा आला असला, तरी 1 जुलैनंतर पावसाने जोरदार पुनरागमन केले. अनेक भागांत अवघ्या सहा दिवसांत संपूर्ण जून महिन्यात होणाऱ्या सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. परिणामी अनेक शहरांमध्ये पाणी साचले, काही ठिकाणी दरडी कोसळल्या, तर अनेक गावांचा संपर्कही तुटला.

आज कोणत्या भागात पावसाचा इशारा?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे आणि जळगाव या भागांत दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात घाटमाथा परिसरात आधीच पावसाचा जोर कायम असून, परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

याशिवाय पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यातही विजांसह पावसाची शक्यता

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासोबतच विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम

सध्या गुजरात आणि केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याच प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Rain Alert
Khadakwasla Dam Water Release: खडकवासला विसर्गाने एकतानगरी पुन्हा जलमय; सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये शिरले पुराचे पाणी

कल्याण-डोंबिवलीत पाणीपुरवठा विस्कळीत

सततच्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून, नदीच्या तीव्र प्रवाहामुळे केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. तसेच मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा गेल्या 48 तासांपासून ठप्प आहे.

यामुळे शहरातील पूर्व आणि पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिक पावसाचे पाणी बादल्या, ड्रम आणि टबमध्ये साठवून दैनंदिन गरजा भागवत आहेत. काही भागात तर पावसाचे पाणी गाळून आणि उकळून पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचे, नदी-नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news