

Municipal Corporation Election 2025 Devendra Fadnavis on Mahayuti
पुणे : महाराष्ट्रात चार महिन्यात महापालिका निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. "काही ठिकाणी जास्त जागा सोडता येत नाही. तिथे अंडरस्टँडिंगने वेगळे लढू आणि स्वतंत्र लढलो तरी एकमेकांवर टीका करणार नाही", असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर होते. दुपारी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले, महापालिका निवडणूक घेण्यात काही अडचण दिसत नाही. ज्या भागात पाऊस जास्त असेल तिथे निवडणूक आयोग आणि सरकार सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना दोषही देता येत नाही. पाच- सात वर्ष ते निवडणूक लढवण्यासाठी मेहनत करत असतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आता संधी आलीये असं वाटणं साहजिक आहे. महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये हेच अँडरस्टँडिंग आहे, आम्ही चर्चेसाठी बसलो तेव्हा सांगितलं की स्वाभाविक युती केली पाहिजे. पण जिथे युती शक्य नाही तिथे स्वतंत्र लढावं. निवडणुकीनंतर पुन्हा महायुती आहेच, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
काही अपवादात्मक ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढू. अशा ठिकाणी आम्ही एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचारावर भर देऊ.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले?
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने गुरुवारी खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाला दिले होते. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, मी नुकताच हा निर्णय समजून घेतला आहे. आमची तयारी असून सरकार भक्कमपणे बाजू मांडू असे आश्वासन त्यांनी दिले.
शहरी मतदारांवर प्रभाव कोणाचा?
27 महापालिकांचा विचार केल्यास एकूण 2, 736 जागा आहेत. 2015 ते 2018 या कालावधीत झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये 26 पैकी 16 ठिकाणी भाजपचा विजय झाला होता. तर शिवसेना (त्यावेळी शिवसेनेच दोन गट नव्हते) आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येक पाच महापालिका आल्या होत्या. तर राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या वाट्याला एक महापालिका आली होती.