

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत 'गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती' योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी टाइम्स किंवा क्यूएस रैंकिंग प्रणालीत २०० च्या आत असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
विद्यार्थ्याने कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, अभियांत्रिकी / वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र यांपैकी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्यास, त्याला योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांला ९ ऑगस्टपर्यंत https:///fs.maharashtra.gov. in या लिंकद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
त्याचप्रमाणे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. कला, वाणिज्य, विधी, विज्ञान अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी जवळच्या उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयात, तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी / वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र शाखेतील अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयात १९ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करायची आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली आहे.