

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पुणे-बंगळूर, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गांवरील महापुराच्या पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने केली. या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, सचिव राज डोंगळे यांनी सांगली येथे गडकरी यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी पुराच्या पाण्यास अडथळा ठरणार्या भरावांतून क्रॉस ड्रेन करा, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, महापुराच्या क्षेत्रातील सर्व रस्ते 'व्हाया डक्ट' पद्धतीने बांधावेत, त्यासाठी डिझाईन, निकषांत बदल करावा. कराड-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डिझाईनमध्ये काही बदल केला आहे. मात्र, अंमलबजावणीस वेळ लागणार असल्याने सध्या खड्डेविरहित तंत्राचा वापर करून महापुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मल्टिपल ड्रेन्स घ्यावेत.
कोल्हापूर येथील नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या संबंधित अधिकार्यांना भेटून याबाबत तयार असलेला प्रस्ताव पाहून आवश्यक बदल सूचवा, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, माजी आमदार अमल महाडिक सत्यजित कदम उपस्थित होते.