कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हसन मुश्रीफ यांच्या नविद, आबिद व साजीद या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर 16 फेब—ुवारीला सुनावणी होणार आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख जामीन अर्जात करण्यात आला आहे. नविद, आबिद व साजीद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर विशेष 'पीएमएलए' कोर्टात हे अर्ज दाखल केले आहेत. राजकीय हेतूने अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचे अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, आयकर विभागाने यापूर्वी 11 जानेवारी रोजी हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना येथे छापे टाकले होते. मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरी तसेच पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअरसमोर पेट्रोल पंपामागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली होती.
त्यानंतर 1 फेब—ुवारी रोजी हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी, गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखांवर छापे घातले होते. तब्बल 30 तासांच्या चौकशीनंतर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह पाच अधिकार्यांनाही ताब्यात घेत मुंबईला नेऊन चौकशी केली होती.
त्या अधिकार्यांची 70 तासांनी 'ईडी'ने सुटका केली होती. सरसेनापती संताजी घोरपडे, ब्रिक्स, बिद्री व भोगावती सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवहारांबाबत 'ईडी'ने चौकशी केली. संबंधित अधिकार्यांकडून कर्ज प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आली. कापशी शाखेतील सर्व शेतकरी ठेव पावत्यांची झेरॉक्स प्रत 'ईडी'ने घेतल्याचे समजते.