हद्दवाढ करा, मगच निवडणुका : सर्वपक्षीय कृतीसमितीचा इशारा

फोटो : 0014

कोल्हापूर : सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत बोलताना अ‍ॅड. बाबा इंदुलकर. सोबत सुभाष जाधव, आर. के. पोवार, बाबा पार्टे, जयुकमार शिंदे आदी. (छाया : पप्पू अत्तार)
फोटो : 0014 कोल्हापूर : सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत बोलताना अ‍ॅड. बाबा इंदुलकर. सोबत सुभाष जाधव, आर. के. पोवार, बाबा पार्टे, जयुकमार शिंदे आदी. (छाया : पप्पू अत्तार)

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिका निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत रविवारी देण्यात आला. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत समितीच्या निमंत्रकपदी आर. के. पोवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दरम्यान, हद्दवाढप्रश्नी गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना व्यापक शिष्टमंडळ भेटणार आहे. बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. हद्दवाढीस छुपा विरोध करणारे शोधून काढण्यासाठी हद्दवाढ समर्थक व विरोधक यांची बिंदू चौकात खुली चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. त्या संयुक्त बैठकीत कोणताही वादविवाद न करता समन्वयाने चर्चा करून ग्रामीण जनतेचा विश्वास संपादन करण्याचे काम करूया, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

आर. के. पोवार म्हणाले, महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्या सभागृहातच हद्दवाढीची मागणी करण्यात आली होती. तेव्हापासून आजतागायत इतकी वर्षे ही मागणी रेटून धरण्यात आली आहे. असे असूनही हद्दवाढ होऊ शकली नाही. मात्र आता खरी वेळ आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय शहराचा व जिल्ह्याचा विकास होणार नाही. त्यामुळे आता मागे हटायचे नाही. अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, हद्दवाढ केवळ शहराच्या विकासासाठी नको तर आपला संपूर्ण जिल्हा महाराष्ट्रात नंबर एक झाला पाहिजे. शहरी नागरिकांना मिळणार्‍या सर्व सुविधा ग्रामीण जनतेलाही मिळाल्या पाहिजेत. ग्रामीण जनतेचा आता विरोध मावळत आहे. त्यांना समजून सांगितले पाहिजे. त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. तरच गैरसमज दूर होतील. असे केल्याने हद्दवाढीस पोषक वातावरण निर्माण होईल. त्यासाठी सर्वांची एकजूट असणे गरजेचे आहे.

महापालिकेने शासनाकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविल्यानंतर कोणता पाठपुरावा केला याची माहिती घेण्यासाठी महापालिका प्रशासकांची भेट घेऊन त्यांना साकडे घालूया.

बाबा पार्टे, अनिल घाटगे, सुभाष जाधव, किशोर घाडगे, पांडुरंग आडसुळे, जयकुमार शिंदे, सदाशिव पाटील यांची यावेळी भाषणे झाली. चंद्रकांत बराले, विवेक कोरडे, अजित सासने, महेश जाधव, सुनील पाटील, विजयसिंह पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दुर्गेश लिंग्रस यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news