सीपीआर चतुर्थश्रेणी रिक्त पदे भरण्यास वाटाण्याच्या अक्षता

सीपीआर चतुर्थश्रेणी रिक्त पदे भरण्यास वाटाण्याच्या अक्षता

कोल्हापूर, डॅनियल काळे : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) चतुर्थश्रेणीतील रिक्त 172 पदे भरण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. ठेकेदारीवरच भर देऊन दैनंदिन कामे केली जात आहेत. त्यामुळे स्थानिक भरतीला खो बसत असून, ठेकेदारांचेच उखळ पांढरे होत आहे. राज्य शासनाने भरतीबाबत आदेश काढूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. परिणामी, खासगी ठेकेदारीवरच भर आहे. त्याखेरीज जे उपलब्ध चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. हे रुग्णालय आता 650 बेडचे झाले असून, त्या तुलनेत कर्मचारी भरती नसल्याने सोयीसुविधांवर ताण पडत आहे.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय हे 650 बेडचे आहे. 2000 सालापासून रुग्णालयात पूर्वीच्या तुलनेत सोयीसुविधा वाढत गेल्या. विविध नवे विभाग सुरू झाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले; परंतु चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या संख्येत मात्र वाढ झालेली नाही.

'ही' पदे आहेत रिक्त

चतुर्थश्रेणीतील मुकादम, मुख्य स्वयंपाकी, शस्त्रक्रिया परिचर, प्रयोगशाळा परिचर, क्ष-किरण परिचर, माळी, शिपाई, धोबी, न्हावी, पहारेकरी, मदतनीस, कक्षसेवक, सफाईगार ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवासुविधांवर ताण पडतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news