

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सदस्यांना बोलण्यास माईक दिला नाही म्हणून सभागृहात थेट स्पिकर व माईक आणल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या 56 व्या सर्वसाधारण सभेत रविवारी खडाजंगी झाली. स्पिकर बाहेर नेण्यास कर्मचार्यांना सांगण्यात आले; परंतु त्याला विरोध केल्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष राजीव परीट होते.
कृष्णात किरुळकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष परीट यांनी संस्थेच्या प्रगतीचा व गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतला. यानंतर विषयपत्रिकेचे वाचन व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी केले. सचिन जाधव यांनी बोलण्यासाठी माईकची मागणी केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सचिन आंबेकर थेट स्पिकर व माईकच सभागृहात घेऊन आले. याला संचालकांनी आक्षेप घेतला. एम. आर. पाटील यांनी, सदस्यांना माईक देण्यास संस्था समर्थ आहे. संस्थेला भीक लागलेली नाही, असे सांगून स्पिकर बाहेर नेण्यास सांगितले.
गडहिंग्लज शाखेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे अध्यक्ष परीट यांनी सांगितले. राजन दड्डीकर यांनी, काही थकबाकीदारांची कर्ज प्रकरणे 'ना हरकत' प्रमाणपत्र न घेता मंजूर करत असल्याचा आरोप केला. असे झाले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे एम. आर. पाटील म्हणाले.
निवृत्त कर्मचार्यांचा याप्रसंगी सत्कार झाला. उपाध्यक्ष दिनकर तराळ यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी काळे, रामदास पाटील, विजय टिपुगडे, रवींद्र घस्ते, रणजित पाटील, सुनील मिसाळ, श्रीकांत वरुटे आदी उपस्थित होते.