शेतकरी संघटना कार्यकर्त्यांची नदीत उडी

कोल्हापूर : पंचगंगा नदीत उड्या टाकलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत असताना पोलिस व ‘एनडीआरएफ’चे जवान.
कोल्हापूर : पंचगंगा नदीत उड्या टाकलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत असताना पोलिस व ‘एनडीआरएफ’चे जवान.

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी पंचगंगा नदीत उडी टाकून आंदोलन केले. शिये गावातील पूरग्रस्तांचे गावातच पुनर्वसन करा, यासह अन्य मागण्यांसाठी रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी पंचगंगा नदीत उडी टाकून आंदोलन केले.

यावेळी पोलिस आणि 'एनडीआरएफ'च्या जवानांची चांगलीच भंबेरी उडाली. कार्यकर्त्यांना पाण्यातून बाहेर काढत असताना झटापट झाली. अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. करवीर पोलिस ठाण्यात आणून नंतर सोडून दिले.

शिये गावचे पुनर्वसन करावे, पूरग्रस्तांचे पुनर्वसन गावातच करावे, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली आहेत; पण शासनाने याची दखल घेतलेली नाही. उलट शिये गावातील गायरान जागेवर अतिक्रमण करून गौण खनिज उत्खनन सरू आहे. हे गावातील महसूल अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देऊनही गावातील महसूल अधिकार्‍यांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे संघटनेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

याचाच भाग म्हणून सोमवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत उड्या मारण्याचे आंदोलन केले.

दुपारी चार वाजता कार्यकर्ते पंचगंगा नदी घाटाकडे आले. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानासह पोलिस, एनडीआरएफचे जवान बोट घेऊन नदीत तैणात होते. घाटापासून काही अंतर असताना दोन ते तीन कार्यकर्‍त्यांनी पळत जाऊन त्यांनी नदीत उड्या घेतल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने शासकीय यंत्रणेची भंबेरी उडाली.

त्याचवेळी करवीर पोलिसांनी नदीत उड्या टाकल्या, एनडीआरएफचे जवान बोट घेऊन आले, त्यांनी पाण्यात पोहत असलेल्या कार्यकर्‍त्यांना पकडून बाहेर काढले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे, उत्तम पाटील, बाबासो गोसावी, देवदास लाडगांवकर, के.बी.खुटाळे, धनाजी चौगले, अभिजित चौगले यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news