‘शिवाजी द ग्रेट’च्या परदेशी संदर्भ साधनांवर आधारित शिवचरित्राची मराठीत निर्मिती

‘शिवाजी द ग्रेट’च्या परदेशी संदर्भ साधनांवर आधारित शिवचरित्राची मराठीत निर्मिती

कोल्हापूर; सागर यादव :  शिवरायांचा इतिहास जुलमी अफजलखानाचे पोट फाडण्यापुरता आणि शाहिस्तेखानाची बोटं तोडण्यापुरता मर्यादित स्वरूपात दाखविण्यात आला आहे. याला बगल देत, शिवछत्रपती भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुवतारा होते. महान देशभक्त आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरिता लढणारे अमर अवतारी पुरुष ठरले. इतकेच नाही तर त्यांनी जगज्जेत्यांच्या नभोमंडलात उच्च स्थान पटकावले आहे, अशा शब्दांत थोर इतिहास संशोधक डॉ. बाळ कृष्ण यांनी शिवछत्रपतींची महती सांगितली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून डॉ. बाळ कृष्ण यांच्या संशोधनावर आधारित 'शिवाजी द ग्रेट' या इंग्रजी शिवचरित्रावर आधारित 'महान शिवाजी' खंड 1-2 आणि खंड 3-4 या दोन ग्रंथांची निर्मिती करण्यात आली आहे. या शिवचरित्राचे संपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे. तब्बल 50 हून अधिक पानांची प्रदीर्घ व विवेचक प्रस्तावना डॉ. पवार यांनी या शिवचरित्रासाठी लिहिली आहे. अनुवाद वसंत आपटे यांनी केला आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 1400 पानांच्या दोन खंडांच्या शिवचरित्राची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवार, दि. 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, पद्मश्री खा. कुमार केतकर यांच्या हस्ते आणि शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या शिवचरित्राचा प्रकाशन सोहळा होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे आद्य संकल्पक

डॉ. बाळ कृष्ण यांचा जन्म 22 जुलै 1882 रोजी पंजाबमधील मुलतान येथे झाला. 1998 साली ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इतिहास विषयात लंडन विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळवली. भारतात परतल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या आग्रहामुळे ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू झाले. पुढील 18 वर्षे ते कोल्हापुरात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कोल्हापूरला विद्यापीठ उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली असल्याने शिवाजी विद्यापीठाचे ते आद्य संकल्पक ठरले. 21 ऑक्टोबर 1940 रोजी त्यांचे निधन झाले.

हे संशोधन नव्या अभ्यासकांसाठी प्रेरक

आपल्या प्रकृतीचा विचार न करता अथक परिश्रम आणि हजारो रुपये खर्चून डॉ. बाळ कृष्ण यांनी शिवचरित्राची निर्मिती केली होती. पारंपरिक मराठी, मोडीतील बखरींबरोबरच प्रथमच इंग्लिश, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच रेकॉर्डस्चा वापर त्यांनी आपल्या संशोधनासाठी केला. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग शिवचरित्र लिहू पाहणार्‍या नव्या संशोधक-अभ्यासकांना एक दिशा देणारा ठरणार आहे.
– डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक,
महान शिवाजी ग्रंथाचे संपादक

तब्बल 10 वर्षे इतिहास संशोधन

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी शिवछत्रपतींच्या जीवनकार्याचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम मराठी भाषा शिकली. मराठीतील मूळ ऐतिहासिक कागदपत्रांचे त्यांनी वाचन केले. शिवचरित्रासाठी माहिती संकलनासाठी त्यांनी लंडन, बटाविया, हेग, गोवा, पाँडिचेरी, चेन्नई, तंजावर, सातारा, पुणे येथील पुराभिलेखागारांना भेटी दिल्या. असंख्य कागदपत्रांतून संदर्भ घेतले. संशोधनासाठी तौलनिक भूमिका स्वीकारून शिवचरित्रातील चुका टाळण्यासाठी मराठी कागदपत्रांमधून मिळणार्‍या माहितीची परदेशी कागदपत्रांतील माहितीशी तुलना करूनच ती वापरली. शिवचरित्र इंग्रजी भाषेतून असल्यामुळे मराठी, डच आणि पोर्तुगीज भाषांतील मूळ कागदपत्रांतील मजकूर डॉ. बाळ कृष्ण यांनी तज्ज्ञांकडून इंग्रजीमध्ये भाषांतरित करून घेतला. अशा या संशोधनातून 1700 पानांचे आणि 4 खंडाचे शिवाजी द ग्रेट हे इंग्रजी भाषेतील शिवचरित्र डॉ. बाळ कृष्ण यांनी निर्माण केले.

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे – जिजाऊ

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन, पाठबळ आणि त्यांनी निर्माण केलेल्या भक्कम पायावरच शिवछत्रपतींनी रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण केल्याची माहिती सर्वप्रथम डॉ. बाळ कृष्ण यांनी आपल्या शिवचरित्रात मांडली. स्वराज्य स्थापन करण्याची प्रबळ प्रेरणा आणि भव्य उत्कट असा वारसा शिवछत्रपतींना शहाजीराजांकडून मिळाला. तर त्याग, सदाचार, कर्तव्यकठोरता, आदर आणि सन्मान अशी उच्चतम मूल्ये जिजाऊंमुळेच शिवबांच्या मनावर खोलवर रुजली होती. यामुळेच पुढच्या काळात मोहाच्या कित्येक प्रसंगांतही शिवाजीराजांचे चित्त किंचितमात्र विचलित झाले नाही, अशा शब्दांत डॉ. बाळ कृष्ण यांनी शहाजीराजे व जिजाऊ यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news