मुंबई : सुरेश पवार : विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना शिवसेना नेते एकनाथ शिंदेे आपल्यासमवेत बंडखोर आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेने रवाना झाले. पहाटेला त्यांनी सुरत गाठली. एक मंत्री, आणखी दोन-तीन मंत्री आणि आमदार असे गुजरातच्या सीमेकडे जात असताना, त्याची गंधवार्ताही पोलिस खात्याला अथवा राज्याच्या गुप्तवार्ता खात्याला लागू नये, याविषयी कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिस खात्याने अथवा गुप्तचर विभागाने याविषयी माहिती दिली असती तरी या अहवालाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले का, अशीही उलटसुलट चर्चा होत आहे.
मंत्र्यांच्या प्रवासात त्या त्या जिल्ह्याच्या हद्दीत सुरक्षा म्हणून पोलिसांचा ताफा असतो. एकनाथ शिंदे, त्यांच्याबरोबरचे मंत्री यांना निश्चित पोलिस बंदोबस्त असलाच पाहिजे. शिंदे आणि इतर जण मुंबईतून ठाण्यात आणि ठाण्यातून पालघर जिल्ह्यात दाखल झाले. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील चेक नाका आहे. या चेक नाक्यावरून त्यांची वाहने गेली असतील, तेव्हा त्यांची किमान नोंद आणि दखल घेतली गेली असणारच. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात या ताफ्याबरोबर पोलिस असणे अपेक्षित आहेत. यदाकदाचित शिंदे यांच्या वाहनांसमवेत पोलिसांचा बदोबस्त नसला तरी वेगवेगळ्या ठिकाणी हा ताफा लक्षात येणे सहज शक्य होते. चेक नाक्यावर तरी हा ताफा गुजरातकडे रवाना झाल्याचे चेक नाक्यावरील कर्मचार्यांच्या ध्यानात यायला हरकत नव्हती. म्हणजेच या सुरत सफरीबाबतीत पोलिस किंवा गुप्तहेर खाते अज्ञानात होते, असे म्हणता येणार नाही.
राज्याचे गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या घडामोडींचा अहवाल गृह खात्याकडे आणि गृहमंत्र्यांकडे निश्चितच आला असण्याची शक्यता आहे आणि तो पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनाला आणला गेला असण्याचीही शक्यता आहे. ही सुरत सफर अचानक का झाली असावी, याचा अंदाजही या धुरिणांना सहजच बांधता आला असणेही शक्य आहे.
तथापि, ही अशी माहिती मिळूनही त्याविषयी मौन का पाळले गेले, या विरोधात हालचाल का झाली नाही, अशी चर्चा आता जोर धरत आहे. या निमित्ताने शिवसेनेत फूट पडत असेल, तर त्याचा उद्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस पक्षाला लाभ होणार नाही; या फुटीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होईल, अशी अटकळ बांधून या फुटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असावे काय, याकडेही या चर्चेचा रोख आहे.
पोलिस आणि गुप्तचर खात्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनाही सादर होतो. तो वेळेत सादर झाला की वृत्त वाहिन्यांच्या बातम्यांबरोबरच सादर झाला, हे काही समजलेले नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्या आक्रमकपणे या घडामोडीवर डॅमेज कंट्रोल करायला हवे होते, तसे काही झालेेले नाही. त्याविषयीही आश्चर्य व्यक्त होत आहे.
लाभ राष्ट्रवादीचाच!
शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे सर्वाधिक राजकीय लाभ राष्ट्रवादी काँग्रेसचाच होण्याची शक्यता आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फुटीमुळे शिवसेनेला जबरदस्त फटका बसणार हे स्पष्टच आहे. ती पोकळी भरून काढण्यात आणि राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होणार यात शंका नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या सुरत सफरीची चाहूल लागूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुरिणांनी 'अळी मिळी, गुप चिळी'चे धोरण स्वीकारल्याचा संशय बळावत चालला आहे.