कोल्हापूर : शाहू मिलमध्ये शुक्रवारपासून कृषी प्रदर्शन

कोल्हापूर : शाहू मिलमध्ये शुक्रवारपासून कृषी प्रदर्शन
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत कोल्हापुरात शाहू मिल येथे शुक्रवार दि. 20 ते रविवार दि. 22 या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असेल, या प्रदर्शनात शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे व नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी मंगळवारी केले.

या प्रदर्शनात 27 शासकीय विभागांची दालने आहेत. त्याद्वारे त्या विभागातील कृषिविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. हरितगृह, बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन, रेशीम विकास, मत्स्योद्योग, अ‍ॅक्वाकल्चर, दुग्धव्यवसाय व डेअरी, साठवणूक तंत्रज्ञान, प्रक्रिया व पॅकेजिंग, अपारंपरिक ऊर्जा, मार्केटिंग तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञानच, जमीन आरोग्य पत्रिका, माती व पाणी परीक्षण, भात लागवडीचा सुळकूड पॅटर्न, किचन गार्डन, शेततळ्यातील मस्त्यपालन, विदेशी भाजीपाला, फळप्रक्रिया, व्हर्टिकल गार्डन आदींची माहिती मिळणार आहे. हेक्टरी 125 टन ऊस उत्पादनाबाबत माहिती देणारे दालन या प्रदर्शनात आहे. प्रदर्शनात शासकीय फळरोपवाटिकेतील आंबा, काजू, चिकू आदींची दर्जेदार फळरोपे कलमे शासकीय दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. देशी बियाण्यांसह पपईची चेरी, काळा भात, काजू गोंडे, जरबेरा, झुकीनी, काजू, संकेश्वरी मिरची, ऊस, गुलाब यांचे नमुनेही पाहता येणार आहेत.

राजर्षी छत्रपती शाहूंनी 1902 साली करवीर इलाक्यात दुष्काळाचा प्रतिबंध करण्यासाठी जलसिंचन धोरण जाहीर करून इरिगेशन विभाग सुरू केला. दुष्काळ, बलुतेदारी, जमीन महसूल, कर्ज पुरवठा, सावकारी, जनावरे पैदास इ. बाबत निर्णय घेऊन कार्य केले. त्यांच्या निर्णयांची अंमलबजवणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी तसेच कृषी विकासाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

300 हून अधिक स्टॉल्स
खते, बियाणे, सिंचन, अवजारे तसेच शेती पूरक उत्पादनांचे 300 स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत. शेतीविषयक संपूर्ण माहिती प्रात्यक्षिक व मॉडेलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. शेती तज्ज्ञ, मार्गदर्शकांची विविध विषयांवर चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, स्लाईड शोज याचेही आयोजन केले आहे. महिला बचत गटांसाठीही स्टॉल्स उपलब्ध असून त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

धान्य महोत्सवाचेही आयोजन
कृषी क्षेत्रात विकसित झालेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रगतिशील शेतकर्‍यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या यशोगाथा, शासनाच्या विविध विभागाच्या योजना, उपक्रमांची माहिती, अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, नावीन्यूपर्ण प्रयोगशील शेतकर्‍यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषिपूरक व्यवसाय आदींचे मार्गदर्शन व तंत्रज्ञान, आधुनिक शेती उपयोगी मशिनरी याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहता येणार आहे. उत्पादक ते थेट ग्राहक विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य महोत्सवाचेही या प्रदर्शनात आयोजन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news