कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
ऊन, वारा, पाऊस, महापूर व कोरोना अशा बिकट परिस्थितीत काम करणार्या वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थ्यांच्या संघर्षाला रविवारी नवे 'अग्निपंख' मिळाले. निमित्त होते दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्याचे…
शिक्षणच जीवन बदलू शकते. विद्यार्थ्यांनी कोणतेही क्षेत्र निवडून त्यात उल्लेखनीय कार्य करून माजी राष्ट्रपती डॉ. ए. जे. पी. अब्दुल कलाम यांचे कृतिशील वारसदार बनावे, असे आवाहन कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी यावेळी केले.
दै. 'पुढारी'तर्फे रविवारी शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थी सन्मान सोहळा झाला. याप्रसंगी जिल्ह्यातील 120 वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रायोजक कोल्हापूर कॅन्सर सेंटर होते. यावेळी डॉ. पवार म्हणाल्या, घरबसल्या वृत्तपत्र मिळणे छोटी गोष्ट वाटत असली तरी पडद्यामागे अनेकांचे हात राबतात. परिस्थिती हालाखीची म्हणून काम करताना अनेक गोष्टी आपण शिकतो. महापूर व कोरोना काळात हे माझे काम समजून ते लहान वयात वृत्तपत्र विकण्याचे काम मुले करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव म्हणाले, वृत्तपत्र विक्रेते हे खर्या अर्थाने 'पुढारी'चे ब—ँड अॅम्बेसिडर आहेत. विविध उपक्रमांतून वर्षभर त्यांच्याशी संवाद सुरू असतो. महापूर व कोरोना काळात वृत्तपत्र विक्रेत्यांना दै.'पुढारी'ने मदतीचा हात दिला. डॉ. अब्दुल कलाम यांना शालेय वयात गरिबीमुळे वृत्तपत्र वाटण्याचे काम करावे लागले. आजच्या पिढीचे विशेषत: वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थ्यांचे ते आदर्श आहेत. वृत्तपत्रांचे वाटप करत विद्यार्थी शिक्षण घेत आपल्या कुटुंबास मदत करीत आहेत. त्यांना जीवनातील हा संघर्ष करू द्या. विद्यार्थ्यांच्या मूळ स्वप्नाचा शोध घेऊन त्यांना पाठबळ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थ्यांनी कष्टातून प्रामाणिकपणे कामास प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. ते इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहेत. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार अध्यक्ष शिवगोंडा खोत म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता सन्मानाने जगला पाहिजे यासाठी दै. 'पुढारी' पाठीशी ठामपणे उभा आहे. दै.'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना आलेल्या अडचणी ज्या-त्यावेळी बैठका घेऊन सोडविण्याचे मोठे काम केले आहे. महापूर, कोरोना काळात मदत केली आहे. आज वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचले आहेत.
कागल तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवाजी मगदूम म्हणाले, महापूर, कोरोना काळात वृत्तपत्र विक्रेत्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी दै.'पुढारी'ने पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावावा. सोळांकूरचे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कुंडलिक पाटील म्हणाले, दै. 'पुढारी'ने वृत्तपत्र विक्रेत्यांसह विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या आहेत. 'पुढारी' परिवार वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे.
सहायक वितरण व्यवस्थापक अमर पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्नेहा मांगूरकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक वितरण व्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी 'पेपरवाला आला… पेपरवाला आला…' या वृत्तपत्र विक्रेत्यांवर आधारित गीत कलाकार गणेश मोरे यांनी वासुदेवाच्या वेशभूषेत सादरीकरण करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. त्याला सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
आ. प्रकाश आवाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत इचलकरंजी शहरातील 30 वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थ्यांना कार्यक्रमास येण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिलेे. यावेळी सहायक वितरण व्यवस्थापक उत्तम पालेकर यांच्यासह वितरण प्रतिनिधी शशांक पाटील, किशोर मोरे, श्रीकांत सावंत, रवींद्र पाटील, बी. डी. चौगुले, रघुनाथ दळवी, गणेश लायकर, अक्षय पाटील, उमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थी सन्मान सोहळ्याप्रसंगी हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे. दरवर्षी एका विद्यार्थिनीच्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याची घोषणा कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी यावेळी केली.
वृत्तपत्र विक्रेते विद्यार्थी परिस्थितीवर मात करीत 'कमवा आणि शिका' हे ब—ीद जपत आहेत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप प्रेरणादायी आहे. दै.'पुढारी'चा हा उपक्रम होतकरू तरुणांसाठी आशादायी व मार्गदर्शक आहे. 'कमवा व शिका' योजनेतून विद्यार्थी वृत्तपत्र विक्रेत्यांना सर्वतोपरी सहकार्य करू.
– डॉ. एन. एल. तरवाळ,
मुख्य अधीक्षक, शिवाजी विद्यापीठाचे डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनदै.'पुढारी'ने वृत्तपत्र विक्रेता विद्यार्थ्यांचा सन्मान करून नवा आदर्श घालून दिला आहे. मुलगी म्हणून वृत्तपत्र वाटप करताना येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी या सन्मानाने बळ मिळाले आहे. वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहे. हे केवळ दै.'पुढारी'मुळेच शक्य झाले आहे.
– शर्वरी विनोद पाटील, अर्जुनवाड, ता. शिरोळ