विद्यार्थ्यांनो, तुमचे भवितव्य तुमच्याच हातात : सतेज पाटील

विद्यार्थ्यांनो, तुमचे भवितव्य तुमच्याच हातात : सतेज पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांनो, करिअर चांगले निवडा, तुमचे भवितव्य तुमच्याच हातात आहे. जे चांगले, योग्य वाटते त्यामध्ये करिअर करून जीवनात यशस्वी होण्याची जिद्द ठेवा. माहिती, तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या चक्रातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचे नव्हे तर जीवन जगण्याचे व मन स्थिर ठेवण्याचे योग्य मार्गदर्शन शिक्षण संस्थांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत 'एज्युदिशा-2022' शैक्षणिक प्रदर्शनाचे राजारामपुरीतील ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉलमध्ये शनिवारी सकाळी शानदार उद्घाटन झाले. यावेळी मंत्री पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एज्युदिशा प्रदर्शनाचे पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी-पीसीबी, लातूर आहेत. तसेच सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूर आहेत. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे व सिम्बॉयसिस स्कील्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे हे सहप्रायोजक आहेत.

मंत्री पाटील म्हणाले, दोन वर्षांनंतर सगळे ऑफलाईन होऊ लागले आहे. स्पर्धेच्या काळात करिअर संधी यासंदर्भात माहिती देण्याचे काम दै. 'पुढारी' आयोजित 'एज्युदिशा' उपक्रमाने एकाच छताखाली केले आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. यामुळे कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंटरनेटमुळे शैक्षणिक कोर्सेसची माहिती उपलब्ध झाली आहे. पूर्वी पारंपरिक अभ्यासक्रम शिकणे आणि मित्र, आई-वडील सांगतील त्या क्षेत्रात करिअर करणे याशिवाय पर्याय नव्हता. आज स्कील डेव्हलपमेंटबरोबरच आयटीआय, पॉलिटेक्निकमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

पूर्वी डॉक्टर, इंजिनिअर झाले की करिअर संपले असे म्हटले जात होते, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, आज करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. विशिष्ट विषयाचे शिक्षण घेता येत असून, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन वापरला जात आहे. काही वर्षांपूर्वी चांगले महाविद्यालय, कोर्सला प्रवेश मिळेल का? याची विद्यार्थ्यांना विवंचना होती.

शिक्षणात आता आमूलाग्र बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांना आवड असेल त्या विषयात करिअर करणे शक्य झाले आहे. नव्या पिढीसमोर अनेक अडचणी आहेत. फेसबुक व इन्स्टाग्रामवर हजारो मित्र आहेत; परंतु जिवाभावाचे मित्र कमी झाले आहेत. शारीरिकबरोबरच मानसिकदृष्ट्या नवी पिढी स्ट्राँग असली पाहिजे. नवीन तंत्रज्ञान, स्पर्धेच्या युगात शैक्षणिक संस्?थांनी इंटेलिजंट क्वोशंटपेक्षा इमोशनल क्वोशंट विचार करणे गरजेचे आहे.

इंडस्ट्री 5.1, वेब-3 ची चर्चा सुरू आहे. शिक्षणाचा मोठा विस्तार झाला आहे. आज संधींबरोबर विविध क्षेत्रांत स्पर्धा वाढली आहे. आजचे तंत्रज्ञान तीन वर्षांनी राहील का? याबाबत शंका आहे. त्यामुळे सातत्याने अपडेट राहणे आवश्यक आहे. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे निश्चित धोरण असले पाहिजे. पालकांनी कारण नसताना पाल्यांवर करिअरबाबत दबाव टाकणे थांबविले पाहिजे. पाल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली पाहिजे. इंटरनेट 306 प्लॅटफॉर्मवर सर्व माहिती मिळते. मात्र, संवादात्मक माहितीचा अभाव आहे. विद्यार्थ्यांना कोव्हिडमुळे ऑनलाईनची सवय लागली आहे; परंतु आजही माणूस भेटला पाहिजे, शंकांचे निरसन झाले पाहिजे, असे अनेकांना वाटते. दै. 'पुढारी' 'एज्युदिशा' च्या माध्यमातून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची संधी मिळाली आहे, याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही मंत्री पाटील म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दै.'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी केले. निवेदक विश्वराज जोशी यांनी आभार मानले. यावेळी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुुलगुरू डॉ. अरुण पाटील, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे राजेश वशीकर, एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेचेे प्रा. डॉ. राजेश जाधव, सुनील चवळे, प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूरचे प्रा. प्रमोद घुगे, सिम्बॉयसिस स्कील्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणेचे गणेश लोहार, आयआयबी-पीसीबी, लातूरचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रा. चिराग सेन्मा आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रलोभने
जुन्या काळात फिरायला जाणे, खाणे व सिनेमा पाहणे एवढीच विद्यार्थ्यांसमोर प्रलोभने होती. आज काळ बदलला आहे, त्याप्रमाणे नवी पिढी बदलली आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर चांगली-वाईट एक लाख प्रलोभने समोर येत आहेत. या प्रलोभनांस विद्यार्थी बळी पडू शकतात. यातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे काळाची गरज असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news