विद्यार्थ्यांनी जीवनात सक्षम होऊन देश विकासाला हातभार लावावा : डॉ. भाग्यश्री पाटील

विद्यार्थ्यांनी जीवनात सक्षम होऊन देश विकासाला हातभार लावावा : डॉ. भाग्यश्री पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आजची पिढी डिजिटल टेक्नोसॅव्ही आहे. तीच भविष्यात देशाचे नेतृत्व करणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: सक्षम होऊन वाटचाल करावी. आयुष्यभर कष्ट घेतलेल्या आई-वडील, शिक्षकांना विसरू नये. संयम, आत्मविश्वास, इच्छाशक्तीच्या जोरावर जीवनात यशस्वी होऊन देश विकासास हातभार लावावा, असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी केले.

हॉटेल सयाजी येथील विशेष समारंभात सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप योजनेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील, दै. 'पुढारी'च्या संचालिका सौ. गीतादेवी प्रतापसिंह जाधव, कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा व दै.'पुढारी'च्या संचालिका सौ. स्मितादेवी योगेश जाधव, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन पुणेच्या उपाध्यक्षा सुप्रिया चव्हाण-पाटील, डी. वाय. पाटील अ‍ॅकॅडमी शांतिनिकेतनच्या राजश्री एम. काकडे उपस्थित होत्या.

डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, 1965 साली मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचे धाडस आईने केले. तिच्यामुळेच आज पाचही भावंडांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविला आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक विचारांचा वारसा जपत संस्थेचा विस्तार सुरू आहे. आज भारतातील तरुणांची संख्या जगात सर्वाधिक आहे. जीवनात पैशासह प्रत्येक गोष्ट सहज मिळावी, असे त्यांना वाटते. लक्ष्य गाठताना मन सैरभैर धावते. अशा परिस्थितीत तरुणांनी बिल गेट, सुधा मूर्ती यांच्यासारखे काम करण्याची तयारी ठेवावी. पालकांनीही मुलांमध्ये तुलना करताना विचार करावा. जीवनात सक्षम झालेल्यांनी एखादा विद्यार्थी दत्तक घेऊन पुण्याईचे काम करावे.

डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील ग्रुप नेहमीच सामजिक जाणिवेतून काम करत आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रुपच्या विविध संस्थांमध्ये प्रथम वर्षासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत संपूर्ण वर्षाची फी माफ केली जाणार आहे. चार वर्षांनंतर स्कॉलरशिपची रक्कम तीन कोटी होऊन 325 विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

आ. सतेज पाटील म्हणाले, आईने जीवनात अनेक धक्के सहन करीत आम्हाला घडविले. मोठे होण्यात आईचा सिंहाचा वाटा आहे. आज मिळालेली प्रतिष्ठा, वैभव यामागे आईचे मोठे योगदान आहे. चांगल्या-वाईट दिवसांत ती नेहमीच पाठीशी उभी असते.

याप्रसंगी केक कापून सौ. शांतादेवी डी. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या जीवनप्रवासावरील चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, देवराज पाटील, आ. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, मेघराज काकडे, करण काकडे, चैत्राली काकडे, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साटम, पी. डी. उके उपस्थित होते. प्रा. मधुगंधा मिठारी, प्रा. राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले. आ. ऋतुराज पाटील यांनी आभार मानले.

भावंडांना अश्रू अनावर

डॉ. भाग्यश्री पाटील यांनी 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. घरची परिस्थिती हालाखीची होती. प्रसंगी भावंडांनी उसाचा खोडवा, पेंड्या विकून घर चालविण्यास हातभार लावला. प्रसंगी वीज भरण्यास पैसे नसायचे. संघर्षातून सुरू झालेला पाच भावंडांच्या यशाचा प्रवास सोपा नव्हता. त्यामागे आईची जिद्द, मार्गदर्शन, प्रोत्साहन होते, असे भाषणात सांगतानाच डॉ. संजय डी. पाटील यांनी स्टेजवरून उठून त्यांना मिठी मारली. यावेळी दोघे भावुक झाले. त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.

66 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान

डी. वाय. पाटील ग्रुपने विविध संस्थांमध्ये प्रथम वर्षासाठी सर्वोच्च गुणांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिपने गौरविण्यात आले. आपल्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी स्कॉलरशिप योजनेची घोषणा केली. यावर्षी 66 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news