विजयनगर साम्राज्यकालीन धामापूर धरणाचे 500 एकराला सिंचन

विजयनगर साम्राज्यकालीन धामापूर धरणाचे 500 एकराला सिंचन
Published on
Updated on

कोल्हापूर; सुनील कदम : बांधकाम क्षेत्रात आजकाल रोज नवी क्रांती होताना दिसत आहे, बांधकामाचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होताना दिसत आहे. तरीदेखील परवा-परवा बांधलेला एखादा पूल ढासळताना, एखादे धरणच्या धरण वाहून जाताना दिसत आहे. मात्र तब्बल 500 वर्षांपूर्वी विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेले एक मातीचे धरण आजही कोकणातील जमिनीचे यशस्वीपणे 500 एकराचे सिंचन करताना दिसत आहे. आपल्या पाण्याने जवळपास सात पिढ्यांना पोसणारे, 500 वर्षांपूर्वी बांधलेले आणि अजूनही सुस्थितीत असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील धामापूर धरण म्हणजे जलसिंचन क्षेत्रातील आश्चर्यच मानायला पाहिजे.

जख्म सुखा और धरा को हरा होना चाहिये…! पानी आखों मे नही, नदीयों मे होना चाहिये…!

असेच काहीसे नागेश देसाई नावाच्या त्या अवलियाला वाटले असावे आणि या वाटण्यातूनच तब्बल 500 वर्षांपर्वी आकाराला आले धामापूर धरण! आजही या धरणाच्या पाण्यावर शेतीचे सिंचन होते आणि चार-पाच गावांची तहान भागवली जाते.
चौदाव्या-पंधराव्या शतकामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बहुतांश भूभाग हा विजयनगर साम्राज्याचा भाग होता आणि देसाई नामक घराण्याकडे या भागाची वतनदारी होती. या घराण्यातील नागेश देसाई नामक वतनदारांनी धामापूर आणि काळसे या दोन गावांमधील नागरिकांच्या मदतीने इसवी सन 1530 साली हे धरण बांधल्याच्या ऐतिहासिक नोंदी आढळून येतात.

धामापूर धरण-तलाव!

धामापूर आणि काळसे या दोन गावांच्या आसपासच्या भागातून 60 हून अधिक जे छोटे-मोठे ओढे-नाले वाहतात, त्या ओढ्या-नाल्यांच्या पाणलोट क्षेत्रातून वाहणारे पाणी याच भागात अडवून त्याचा वापर शेती आणि पिण्यासाठी करण्याच्या द़ृष्टिकोनातून धामापूर धरणाची किंवा तलावाची निर्मिती झालेली दिसते. धामापूर धरणाचेपाणलोट क्षेत्र 9.97 चौरस किलोमीटर आहे. धरणाच्या बांधाची उंची 11.43 मीटर असून लांबी 271 मीटर आहे. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 2.867 क्यूबीक मिटर (0.10 टीएमसी) एवढी आहे. या धरणाच्या पाण्यावर आजही जवळपास 500 एकर जमिनीचे सिंचन होते, तर धामापूर, काळसे आणि मालवणसह अन्य काही गावांची तहानही भागविली जाते.

अफलातून बांधकाम!

धरणाच्या बांधकामासाठी दगड-माती आणि भाताच्या काडाचा वापर करण्यात आलेला आहे. धरणाच्या एका बाजूने योग्य पद्धतीने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होईल याची खबरदारी घेण्यात आलेली दिसते. या धरणातील पाणी आपापल्या शेतापर्यंत नेण्यासाठी त्या काळातील शेतकरी पाईपलाईन म्हणून नारळाच्या झाडाच्या पोकळ खोडांचा वापर करत होते, अशाही जुन्या नोंदी काही ठिकाणी आढळून येतात.

आदर्श जैवविविधता!

पर्यावरण आणि जैवविविधतेच्या बाबतीत आपले पूर्वज किती जागरूक होते, याचे आदर्श उदाहरण म्हणून धामापूर धरणाकडे बोट दाखवावे लागेल. धामापूर धरणाचे एकत्रित प्रभावक्षेत्र 328 हेक्टर इतके भरते. त्यापैकी 21 टक्के भागावर जंगल, 72 टक्के भूभागावर शेती, 5 टक्के भागावर गवताळ कुरण आणि 2 टक्के भागावर नागरी वस्ती आहे. तत्कालीन लोकांना हवामान, पर्यावरण, भौगोलिक. सिंचन, अर्थकारणाबरोबरच तंत्रज्ञानाची किती सखोल माहिती होती, हे या जैवविविधतेवरून लीात यायला हरकत नाही.

धामापुरातील वनसंपदा!

धामापूर धरणाच्या प्रभाव क्षेत्रात वेगवेगळ्या 134 प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. त्यापैकी 34 वनौषधी आहेत. वेगवेगळ्या प्रकारची
33 झुडुपे, 14 प्रकारच्या वेली आणि 3 आर्किड आढळून येतात. या भागात आढलून येणार्‍या बहुतांश वनस्पती या दुर्मीळ आणि अतिदुर्मीळ प्रकारात मोडणार्‍या आहेत. याशिवाय धरणाच्या प्रभावक्षेत्रात बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, जंगली कुत्रे यासह इतरही अनेक छोटे-मोठे प्राणी आणि काही सापांच्या प्रजाती आढळून येतात. विशेष बाब म्हणजे या धरणाच्या प्रभावक्षेत्रात फुलपाखरांच्या तब्बल 39 प्रजाती आढळतात. त्यापैकी काही प्रजाती तर महाराष्ट्रात प्रथमच या भागात आढळून आल्या आहेत. या धरणाचे प्राचीन, ऐतिहासिक आणि पर्यावरण विषयक महत्त्व विचारात घेता त्याचे निकोप जतन करण्याची आवश्यकता आहे.

अनेक भूकंप पचविले, दुष्काळही हटविले!

कोकणची भूमी ही तशी भूकंपप्रवण समजली जाते. वर्षाकाठी या भागात छोट्या-मोठ्या शेकडो भूकंपांची नोंद होते. धामापूर धरणाने
1967 साली झालेल्या 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपासह आजपर्यंत हजारो भूकंप अक्षरश: पचविले आहेत. पण धरणाच्या बांधकामाला कुठे किंचितही धक्का लागलेला नाही. 1972 पासून सलग तीन-चार वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला प्रखर दुष्काळाने होरपळून काढले; मात्र या काळातही धामापूर धरणातील पाणीसाठ्यावर अजिबात परिणाम झाला नव्हता. शेतीच्या सिंचनासह लोकांची तहान भागविण्याचे काम धामापूर धरण या काळातही करतच होते.

मूर्ती लहान, पण कीर्ती महान!

धामापूर धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता एक दशांश टीएमसी आहे. पण त्याची क्षमता कमी असली तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व मात्र अजिबात कमी होत नाही. त्या काळात एवढ्या क्षमतेचे धरण अन्यत्र कुठे बांधल्याच्या नोंदी देशाच्या आणि राज्याच्या इतिहासातही आढळून येत नाहीत. शिवाय कोणतेही तंत्रज्ञान विकसित नसतानाच्या कालावधीत एवढे मोठे धरण बांधणे ही साधीसोपी गोष्ट नाही. संपूर्ण देशात त्या काळात अशा प्रकारची चारच धरणे दिसून येतात, पैकी अन्य तीन आंध्र प्रदेशात आहेत. तीदेखील धामापूर धरणाच्या दोनशे वर्षांनंतर बांधली गेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news