लोकराजाला अभिवादन करण्यासाठी अवघे सज्ज

लोकराजाला अभिवादन करण्यासाठी अवघे सज्ज
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  'बहुजन हिताय, बहुजन सुखाय… या ध्येय उद्देशाने आपली संपूर्ण हयात रयतेसाठी खर्ची पालणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १४९ वा जयंती सोहळा सोमवार, दि. २६ जून रोजी साजरा होत आहे. लोकराजाला मानाचा मुजरा करण्यासाठी अवघे सज्ज झाले आहेत.

दरम्यान, शाहूप्रेमांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राजर्षी शाहू जन्मस्थळ व पुतळे परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहेत. विविध तालीम, संस्था तरुण मंडळांनी राजर्षी शाहूंना अभिवादनाचे फलक उभारले आहेत.

शासकीय अभिवादन, समता दिंडी

सकाळी ८ वाजता शाहू जन्मस्थळी मुख्य शासकीय अभिवादन होणार आहे. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व विविध संस्था- संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता, दसरा चौकातून समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता दसरा चौकातील राजर्षीच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. शाहूप्रेमी संस्था, संघटनांतर्फे व्याख्याने, शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य शिबिरे घेऊन शाहूंच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी शाळा-महाविद्यालयांची प्रभातफेरी निघणार आहे. यात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, एनसीसी कॅडेटसह राजर्षीच्या चरित्रावर आधारित चित्ररथ, फलक, सजीव देखावे यांचा समावेश असणार आहे.

सामाजिक समता परिषद

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दुपारी १२ वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राजर्षी शाहू सामाजिक समता परिषद होणार आहे. यावेळी अभिनेते अमोल पालेकर यांचे मार्गदर्शन होईल. यावेळी शाहू महाराज व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शन, प्रात्यक्षिके अन बरंच काही

जुना राजवाडा येथे छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाहू जयंतीमित शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके होणार आहेत. महानगरपालिकेच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात राजर्षी शाहूंच्या जीवन कार्यावर आधारित चित्र माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे सकाळी १० वाजता खासबाग मैदानात कुस्तीची प्रात्यक्षिके होणार आहेत. माजी खासदार एस. के. डिगे फाऊंडेशनतर्फे दुपारी १२ वाजता शाहू स्मारक येथे, विधवा महिला कृतिशील परिवर्तन परिषद व दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होणार आहे. परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ येथे सकाळी ११ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे.

राजर्षी शाहू पुरस्कार वितरण

राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे आरोग्य सेवेचे प्रणेते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनात सायंकाळी ६ वाजता पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर व शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news